दुसरा भाग-
येथे वाचा.
घराकडे जात असताना त्याला त्या शायरीच्या ओळी सतत आठवत होत्या. सायंकाळच्या भारी ट्राफिक मधून आपण केव्हा घरी पोहोचलो हे त्याला कळाले सुद्धा नाही. नेहमीप्रमाणे स्वरा आपल्या शाळेतल्या गमती जमती विराटला सांगत होती. पण त्याचे सारे लक्ष ओजस्वीशी झालेल्या बोलण्यातच होते. संपदाशी पण तो काही जास्त बोलत नव्हाता.
"अरे काही झालं का ऑफिस मध्ये आज?" संपादने काळजीने विचारलं.
"नाही गं, काहीच तर नाही" अन्नाचा घास घेत विराटने उत्तर दिले.
"मग तू आज असा इतका गप्प का"
"कुठे गप्प आहो, बोलतोय तरी" संपदाकडे लक्ष न देताच विराटने उत्तर दिले.
"मी विचारतेय तेवढंच उत्तर देतोय तू, काही टेन्शन आहे का ऑफिस मध्ये? फार विचारात दिसतोय."
"नाही गं, त्या प्रोजेक्ट बद्दल विचार करत होतो थोडं" विराटने उत्तर दिलं.
"तू म्हणाला होतास ना कि ऑफिसच टेन्शन घरी नाही आणणार म्हणून?" संपदा थोड्या रागात बोलली.
"बरं चुकलं बाबा, जाऊदे सोड, स्वरा अभ्यास करते कि नाही रोज?" गोष्ट टाळण्याकरिता विराटने विषय बदलावीला.
जेवण झाल्यावर त्याने लॅपटॉप उघडला आणि वेदिका ऑटोबद्दल इंटरनेटवर सर्च करून माहिती घेऊ लागला. पण थोड्याच क्षणात त्याला आज तो ओजस्वीबद्दल जे काही बोलला ते आठवायला लागलं. तिची साहित्याबद्दलची आवड, जाण, इच्छा ई. त्याने लगेच 'निदा फाजली' सर्च केलं. त्यांच्याबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल संपूर्ण माहिती वाचून काढली, त्यांच्या काही शायऱ्या वाचल्या. त्याला त्या जास्त कळाल्या नाही पण उत्सुकतेपोटी त्याने वाचून काढल्या. त्याने नंतर इतरही कवी, शायर, लेखक, त्यांच्या कादंबऱ्या यांच्याबद्दल बरीच माहिती वाचली. रात्री उशिरा पर्यंत तो हि सारी माहिती वाचत होता. आता त्याला थोडाफार का असेना साहित्याबद्दल माहित झालं होतं.