05 October, 2019

अनकंट्रोल्ड - भाग 6
पाचवा भाग  - येथे वाचा.

'तुला सांगू नाही शकत विराट मी आज किती खुश आहे ते. माझ्या जीवनातला हा सर्वात नाजूक क्षण होता आणि सर्वात महत्वाचा पण. तू घेतलेला पुढाकार, तुझा स्पर्श, तुझा गंध या साऱ्याच गोष्टीने मला वेडं केलं आणि म्हणूनच मी माझं सर्वस्व तुझ्या चरणी ठेवलं. हा नाजूक क्षण तुझ्यासोबत लिहिला गेला याचा मला खूप आनंद आहे. हे सगळं मनातलं बोलता आलं नाही म्हणून हा मेसेज, बाय, गुड नाईट, लव्ह यु स्विटहार्ट.'

संपदाने मेसेज वाचला. क्षणभर तिला काही कळलेच नाही. एकदम धक्का बसला होता तिला. विराटवर ती डोळे झाकून विश्वास करायची. तिला स्वप्नात सुद्धा त्याच्यावर संशय आला नव्हता. आणि आता डायरेक्ट हे असलं काही वाचून ती पूर्ण हादरून गेली होती. तिला काय करावे काही सुचत नव्हते. तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. स्वरा सारखं विचारत होती कि काय झालं म्हणून पण संपदाचे लक्षच नव्हते. विराट अंघोळ करून बाहेर आला. त्याला संपदा डोळे पुसतांना दिसली. त्याने विचारले काय झालं म्हणून, पण ती काहीच बोलली नाही. तिच्या हातात असलेला आपला मोबाईल त्याने घेतला. ओजस्वीचा मेसेज ओपनच होता. त्याने वाचला.

"अरे देवा, हे काय झालं", विराट मनात पुटपुटला.

त्याला काही सुचत नव्हतं काय बोलावं, तिला कसं समजवावं. तरी त्याने तिला समाजविण्याचा प्रयत्न केला. स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ती काहीच बोलत नव्हती. ती सरळ बेडरूम मध्ये गेली. पलंगावर लेटून रडायला लागली. ती रात्री जेवली नाही, तो पण जेवला नाही.
सकाळी ऑफिसला जायच्या आधी त्याने तिची माफी मागीतली.  एका बेसावध क्षणी मनावरचा 'कंट्रोल' सुटला आणि नको ते घडले म्हणून तिला सांगितले. संपदा काहीच बोलत नव्हती. विराटला पण माहित होते आपल्या हातून चूक झाली म्हणून. रात्रभर झोपला पण नव्हता तो. मनात गिल्टी भावना घेऊनच तो ऑफिसला गेला.

ओजस्वीला या बद्दल काहीच माहित नव्हतं. ती नेहमीप्रमाणे विराटशी बोलू लागली पण लगेच तिने ओळखलं कि काहीतरी झालं आहे. विराटने जेव्हा तिला सांगितलं तेव्हा तिलाही मोठा धक्का बसला. तिने विराटला दिलासा द्यायचा प्रयत्न केला.  त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. दरम्यान दोनदा मिसेस वेदीकाचे कॉल येऊन गेले पण विराटचे भान नव्हते. तो ऑफिसमध्ये जास्त काही बोलला नाही. लवकरच घराकडे निघाला.

ओजस्वीला पण चांगले वाटत नव्हते. आपल्यामुळे विराटच्या वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तिला कसतरीच
होत होतं. आपण तो मेसेज विराटला पाठवून मोठी चूक केली असं राहून राहून तिला वाटत होतं. आपल्यामुळे विराटच्या जीवनात आलेली समस्या आपण काश्याप्रकारे सोडवू शकतो याचा विचार ती करत होती.
... ...

विराट घरी आला. संपदा अजूनही नाराजच होती. तिचा हात हातात घेतला. त्याने पुन्हा एकदा माफी मागितली. तिला विश्वास दिला की पुन्हा असं होणार नाही म्हणून. संपदा शांत स्वभावाची होती. ति कुठल्याच गोष्टीवर जास्त रिऍक्ट झाली नाही.

"विराट प्लिज, मला काहीवेळ एकटं राहायचं आहे." थोड्या  नाराजीच्या आणि थोड्या रागाच्या स्वरात संपदा म्हणाली.

विराटला संपदावर पूर्ण विश्वास होता. ती त्याला माफ करेल याची त्याला खात्री होती.
... ...
संपदाची एक खास मैत्रीण होती. ती साऱ्या गोष्टी तिच्याशी शेयर करीत असे. झालेली गोष्ट संपदाने तिला सांगितली.

"सगळे पुरुष ना सारखेच असतात, जरा कुठे संधी मिळाली की तोंड मारायला तयारच असतात" मैत्रीण चिडतच बोलली.

"विराट नाही आहे ग तसा. मी त्याला एवढ्या वर्षांपासून ओळखते. तो आपल्या कामाच्या आणि फॅमिलीच्या प्रति प्रामाणिक आहे ग, पण कुणास ठाऊक या वेळेस कसा त्याचा कंट्रोल सुटला तर?" संपदाने उत्तर दिले.

"त्याला अद्दल घडविल्याशिवाय सोडू नकोस आता, सरळ लाईनवर आला पाहिजे तो" मैत्रिणीने तावातावाने उत्तर दिले.

"म्हणजे काय करू.?"

"घटस्फोट (Divorce) माग त्याला" मैत्रिणीने मोठ्या ऐटीत सांगितले.

"काय.? डोक्यावर पडली आहेस का तू.?" संपदाने रागाने म्हटले.

"अग येडाबाई, घटस्फोटाची फक्त धमकी दे असं म्हणत आहे मी" मैत्रीण समजावत म्हणाली.

"त्याने काय होईल.?"

"बघ तुझा नवरा कसा तुझ्यासमोर घुटने टेकेल. एकदा त्याने आपकी चुक कबुल करून शरणागती पत्करली कि विजय आपलाच. मग त्याला तू हवं तसं वागवू शकशील." मैत्रिणीने पुन्हा ऐटीत सांगितले.

"काहीही काय.? आणि त्याने स्वतःच चूक कबुल करून माफी पण मागितली आहे." संपदाने उत्तर दिले.

"अरे तू त्याच्या भावनिक सापळ्यात अडकलीस कि काय.? बघ, असं त्याच्यासमोर झुकू नकोस. या पुरुषांना ना कुठे पण आणि केव्हा पण सेक्सच दिसतो. यांच्याशी आपण जरा काय हसून बोललं कि हे सरळ आपल्यासोबत बेडवरचेच स्वप्न पाहायला लागतात. यांच्या डोक्यातच नाही तर संपूर्ण नसानसात तुला वासनाच भरलेली दिसेल. जरा कुठे स्त्री दिसली, गर्दी दिसली कि यांच्यातली वासना जागी होते." मैत्रीण धडाधडा बोलत होती.

"छे, काहीही काय? विराट नक्कीच तसा नाही आहे. मी परपुरुषाचा जेवढा आदर करते ना त्या पेक्षा जास्त विराट परस्त्रीचा आदर करतो. आणि वासना शब्दानेदेखील कधी शिवले पण नाही त्याला नाहीतर मला बेडवर ते जाणवले असते." संपदा शांतपणे बोलत होती.

"मग बायको घरी असतांना परस्त्रीशी संबंध ठेवण्याचे काय कारण, सांग ना?" मैत्रिणीने रागाने विचारले.

"मान्य आहे की विराटच्या हातून चूक झाली. पण या आधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. पुरुष आणि स्त्री यांची विचारसरणी, त्यांचे वागणे आणि त्यांचे हाअर्मोस सगळं अगदी एकमेकांच्या वेगळं असतं. तुला आधी त्यांचा केमिकल लोच्या समजून घ्यावा लागेल." संपदाने शांतपणे उत्तर दिले.

"केमिकल लोच्या? हि काय भानगड आहे?" मैत्रिणीने प्रश्न केला.

"बघ, नैसर्गिकरित्या पुरुष हा स्त्री पेक्षा लवकर उत्तेजित होतो. पुरुषाने एखादी स्त्री बघितली, तिचं एखादं अंग बघितलं तर लगेच त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन, डोपामीन असले केमिकल रिलीज होतात, त्यामुळे त्याची उत्तेजना चाळविली जाते. तो लवकर आकर्षित होतो स्त्री कडे. पण भावनिक स्तरावर तो स्वतःला रोखतो आणि समजावितो कि हे चुकीचं आहे म्हणून पण एखाद्या वेळेस त्याचा हार्मोनल स्तर त्याच्या भावनिक स्तरावर जास्त वरचढ होतो आणि मग सगला प्रॉब्लेम होतो.
मी यात कुठेच वासनेचं किंवा पुरुषाच्या असल्या वृत्तीच समर्थन करीत नाही आहे पण हेच नैसर्गिक आहे आणि हेच सत्य आहे. आणि हजारो, लाखो वर्षांपासून पुरुषच कामक्रीडेसाठी पुढाकार घेत आलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर पुरुष का असे असतात किंवा वागतात हे समजनं सोपं जाईल आपल्याला." संपदा अगदी शांतपणे सांगत होती.

"वाह येडाबाई, काय समर्थन केलंस तू आपल्या नवऱ्याचं" मैत्रीण मस्करीत म्हणाली.

"नाही, मी त्याच्या कृतीचं समर्थन करीत नाही आहे, त्याने जे केलं ते चुकीचचं केलं, पण तू जे म्हणत होतीस ना वासना, सेक्स म्हणून हे सगळं सांगावं लागलं तुला."

"मग काय विचार आहे नवऱ्याबद्दल.?" मैत्रिणीने विचारलं.

"त्यांची शिक्षा तर त्याला मिळेलच, पण तुझ्याशी बोलून माझं मन हलकं झालं" संपदाने हलकेसे स्मित करत उत्तर दिले.
... ...

पुढचे एक दोन दिवस संपदा नाराजच होती. मैत्रिणींशी बोलून संपदाला बरंच हलकं वाटायला लागलं होतं परंतु तिने ते विराटला जाणवू दिलं नाही. या दोन तीन दिवसात विराटही पूर्ण ओशाळला होता. ऑफिसमध्ये तो जास्त कुणाशी बोलत नव्हता. ओजस्वीशी बोलणं व्हायचं पण पहिले सारखं नाही. आपण असं किती दिवस अजून तिच्यासोबत राहणार कारण असं रोज भेटणं, बोलणं झालं तर ती मनातून जायची नाही याची विराटला जाणीव होती. जो पर्यंत ओजस्वी आणि विराट एकाच कंपनीत आहे तो पर्यंत संपदाचा पूर्ण विश्वास संपादन करणं शक्य होणार नाही याची विराटला जाणीव होती. आता काहीतरी वेगळा निर्णय घेण गरजेचं होतं. वेदिका ऑटोच्या प्रोजेक्टसाठी विराटने प्रचंड मेहनत घेतली होती त्यामुळे एकदाचा तो प्रोजेक्ट मिळाला की आपण वेगळी वाट धरायची असं त्याला वाटू लागले. दरम्यानच्या काळात प्रोजेक्ट डिलची बोलणी पण अंतिम टप्यात आली होती.

"काही दोनचार महत्वाच्या गोष्टी बाकी राहिल्या आहे, त्या क्लियर झाल्या की प्रोजेक्ट फायनल करू" मिसेस वेदिका फोनवर म्हणाल्या.

"ठीक आहे, मला सांगा काय आहे ते? मी आपल्या सर्व शंका दूर करायला तयार आहे" विराट उत्तरला.

"आज सायंकाळी तू मला हॉटेल 'लेजन्ट इन'(Legend Inn) मध्ये भेट." वेदिका उत्तरली.

"आज सायंकाळी? लेजन्ट इन? ठीक आहे" विराटने होकार दर्शविला.

ओजस्वी बाजूलाच होती. तिने विचारले पण विराटने तिला काही बरोबर उत्तर दिले नाही.
... ...

विराट सायंकाळी लेजन्ट इन मध्ये पोहोचला. एकदम आलिशान असं फाईव्ह स्टार हॉटेल होतं ते. वेदीकाने रूम बुक केली होती त्या रूम मध्ये तो पोहोचला. काळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल स्लीवलेस ब्लाउज असा वेदीकचा गेटअप होता. तो नक्कीच मिटिंगवाला गेटअप नव्हता पण त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्याच्यासाठी फक्त डिल होणं महत्वाचं होतं.

"काय घेणार? ड्रिंक घेणार का?" वेदीकाने विराटकडे एक कटाक्ष टाकत विचारले.

"नाही वेदिकाजी, हवं तर कॉफी बोलवा माझ्यासाठी" विराट उत्तरला.

"अरे काय विराट, ये शाम मस्तानी, त्यात एवढी महत्वाची डिल, म्हटलं वोडका घेऊ थोडी थोडी" वेदिकाने विराटला विचारले.

"नाही वेदिकाजी मी पित नाही"

वोडका आणि कॉफी आली आणि चर्चेला सुरवात झाली. वेदिका जसजसे वोडकाचे घोट रिचवत होती तसं तशी ती रंगात येत होती. आता हे सगळं विराटला अजब वाटायला लागलं होतं. पण प्रोजेक्टखातर नाईलाजाने तो चूप होता. चर्चेचा विषय बाजूला पडला आणि वेदिका त्याच्याशी फ्लर्ट करू लागली. खरंतर हे त्याच्यासाठी नवीन नव्हतं पण आज वेदिका आपली लाईन क्रॉस करु लागली होती. वेदिका त्याच्या जवळ बसली, त्याचा हात आपल्या हातात घेतला. विराटने हात झटकला आणि थोडा बाजूला सरकला. खरतर तो ज्या टेन्शनमधुन जात होता त्यात हे असं पुन्हा घडणं त्याला झेपणारं नाही याची त्याला जाणीव होती.

वेदीकाचा ग्लास रिकामा झाला होता तो भरण्यासाठी ती थोडी समोर झुकली आणि तिचा पदर खाली पडला, खरंतर तिनेच पाडला होता. मोठा गळा असलेला तिचा ब्लाउज आणि त्यातून दिसणारी ती 'चंद्रकोर'. विराट समजून चुकला होता वेदीकचा उद्देश.

"प्रोजेक्ट तुमच्याच कंपनीला द्यायचं असं फायनल झालं आहे, आता फक्त एकंच गोष्ट बाकी आहे.." वेदीकाने नशा चढलेल्या स्वरातच सांगितले.

"ती कोणती गोष्ट आहे.?" विराटने जागेवरून उठत प्रश्न केला.

"बघ विराट, तू हँडसम आहेस, हॉट आहेस तुझ्यासाठी हि गोष्ट काही मोठी नसणार.." वेदिका विराटच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.

"आहो मॅडम, काय करताय तुम्हीं?" तिला दूर सारत विराट म्हणाला.

"तहान तर ही वोडका भागवते, भूक तू भागवावीस अशी इच्छा आहे." वेदीकाने सरळ ऑफर दिली.

"अहो मॅडम, काही काय बोलत आहात, मी इथे प्रोजेक्ट डिल करायला आलोय" विराट उत्तरला.

"मी पण डिलच करत आहे. तू आत्ता होकार दे मी आत्ता डिल  फायनल करते." वेदीकाने पुन्हा विराटच्या गळ्याभोवती हात टाकत मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या वेळेस विराटने तिला दूर लोटले नाही. खरंतर ज्या प्रोजेक्टसाठी त्याने एवढी मेहनत घेतली होती तो बस आता एक पाऊल दूर होता. प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद त्याला झाला होता तोच त्याच्या समोर संपदाचा चेहरा आला, ओजस्वीचा चेहरा आला. आधीच एक चूक त्याने केली होती. परंतु आता नकार देनं म्हणजे एवढ्या मेहनतीने मिळवलेल्या प्रोजेक्टवर पाणी फेरण्यासारखे होते. त्याने एकदा पुढे बघितलं. त्याची नजर वेदीकच्या वक्षस्थळावरील चंद्रकोरीवर गेली. क्षणात त्याचं टेस्टोस्टेरॉन रिलीज झालं,  डोपामीन रिलीज झालं. तो उत्तेजित झाला परंतु या वेळेस त्याने आपलं मानसिक संतुलन ढळू दिल नाही. तो आपल्या निश्चयावर पक्का होता. प्रोजेक्टच जे होईल ते होईल पण ही चूक पुन्हा करायची नाही यावर तो ठाम होता. त्याने नाही म्हटलं, चक्क नकार दिला.

ठेवढ्यात कुणीतरी दार धाड धाड वाजविले. दोघेही खाडकन भानावर आले. दार लॉक नव्हतं. त्या व्यक्तीने क्षणात दार उघडलं. समोर विराट आणि वेदिका मिठी मारून उभे होते. वेदिकाचा पदर खाली घसरला होता. त्या व्यक्तीला बघताच क्षणी विराटने वेदिकाला दूर ढकलले. वेदिका बेडवर जाऊन पडली.
समोर दारावर उभी असणारी व्यक्ती 'ओजस्वी' होती.

क्रमशः

No comments:

Post a Comment