02 October, 2015

परतफेड (भाग- 1)शनिवार. एक शांत रम्य सायंकाळ. सूर्य मावळतीकडे झुकल्याने एक प्रकारची प्रसन्नता वातावरणात आलेली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरु असतो. सहारे कुटुंबातही तशी शांतात असते. मोठी मुलगी मिथीला ऑफिसच्या एका कार्यक्रमाकरिता बाहेर गेलेली असते. धाकटा मितेश परगावी असतो इंजिनियरिंग साठी. सुनील म्हणजेच मिथीलाचे वडील वाफाळलेला चहा घेत मोहोम्मद राफिंची गाणी ऐकत असतात. अचानक त्यांची नजर दुपारी आलेल्या कुरीयर वर जाते.

"अग वीणा या कुरियरमध्ये काय आहे ते बघ तरी" मिथीलाचे वडील सोफ्यावर निवांत बसुन आपल्या पत्नीला म्हणतात.

"अहो राहुद्याना. ते मिथीलाच्या नावाने आलंय ना, मग तिलाच आल्यावर बघुद्या कि. कश्याला एवढी घाई करता?" मिथीलाची आई स्वयंपाकखोलीतूनच ओरडते.

"जाऊदे सोड, मीच कश्याला उगाच टेन्शन घेतोय?" मिथीलाचे वडील स्वतःशीच पुतापुटतात आणी गाणी ऐकण्यात पुन्हा मग्न होतात.

रात्री 10.30 सुमारास मिथीला कार्याक्रमावारूनच जेवून घरी येते. आल्या आल्या तिची नजर त्या पार्सलवर जाते.

"बाबा, कुणाचं पार्सल आहे हे?"

"अगं तुझंच आहे. बघ की उघडून" बाबा आपले टीवी पाहतच उत्तर देतात.

"उघडलं का नाही मगापासन?"

"अगं हि तुझी आई, तु आल्यावरच उघडायचं म्हणत होती." बाबा उत्तरतात.

"म्हटलं तुझं पार्सल आहे तर तु आल्यावरच उघडूयात" आई उत्तरली. 

मिथीला पार्सल उघडताच आश्चर्यचकित होते. त्यात काही कागदपत्र असतात.

"अगं कसले कागद आहे?" बाबा विचारतात.

"माहित नाही पण जमिनीचे वाटतंय" मिथीला प्रश्नार्थक आवाजात उत्तरते.

"बघू, आण इकडे." बाबा हाथ पुढे करून ती मिथीलाकडून घेतात.

"ओह, हा तर सात-बारा दिसतोय जमिनीचा."

मिथीला प्रश्नार्थक आवाजात, "सात- बारा? कुठल्या जमिनीचा?"

बाबा कागदपत्र थोड्यावेळ बारकाईने बघतात आणी एकदम आश्चर्यचकित होऊन, "अगं, हा तर त्या जमिनीचा सात-बारा आहे जी 'नवजीवन' संस्थेच्या नावे आहे. आणी इतरही जमिनीचे सात- बारा आणी कागदपत्र दिसतायेत इथे"

"काय? नवजीवन च्या जमिनीचा सात- बारा?" मिथीला चेहऱ्यावर आठ्या आणत.

"हो आपल्या स्वान काकांच्याच संस्थेची जमीन आहे ही." बाबा उत्तरतात.

"पण त्या आणी इतर जमिनीचे कागदपत्र आपल्याकडे कशाला पाठवेल कुणी? आणी त्याचं आपण काय करणार ?" आई मधातच विचारते.

"आता मला काय माहीत? पण हे विजयरावांना (विजयराव स्वान) कळवायलाच हवं."

"हो ना. पण मला सांगा पार्सल पाठविणाऱ्याच नाव असेल ना यावर, बघुद्या?" मिथीला पार्सल हातात घेत बघते.

"धनंजय बुरले? हे कोण आहेत?" मिथीला डोक्याला ताण देत विचारते.

"मी पण हे नाव पहिली वेळेसच ऐकते आहे." आई म्हणते.

"मला हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय पण माहित नाही कुठे ते?" मिथीला विचार करत उत्तर देते.

"बरं असुद्या आता, अकरा झालेत, आता झोपूया. मी उद्या विजयरावांना जाऊन भेटतो. हे कागदही देतो आणी त्यांनाच विचारतो. ठीक आहे."

"बाबा मी पण येईल तुमच्या बरोबर" मिथीला उत्तरते.

"ठीक आहे बाबा, येशील. चला शुभ रात्री."

मिथीला या कडेवरून त्या कडेवर नुसती कुस बदलत राहते. त्या कागदपत्रासंबंधी आणी धनंजय बुरले संबंधी विचार तिच्या डोक्यात सुरु असतात. पण काही केल्या त्या सर्वांचा संदर्भ काही लागत नाही.
सकाळी मिथीला बाबांबरोबर नवजीवन संस्थेच्या ऑफिसात पोहोचते. आधीच फोन वरून कळविल्याने संस्थेचे अध्यक्ष विजयराव स्वान ऑफिसात आलेल असतात. विजयराव बारकाईने कागदपत्रे पाहू लागतात. ती कागदपत्रे पाहून ते आश्चर्यचकित होतात कारण नवजीवन संस्थेच्या जमिनीचा सात-बारा हरवला असतो आणी हि त्याची डुप्लिकेट प्रत असते आणी ती अतिशय महत्वाच्या वेळी विजयरावांच्या हातात पडलेली असते.

"आता याचा कोर्टात पुरावा म्हणून उपयोगी होईल," विजयराव आनंदी स्वरात ती प्रत दाखवत म्हणतात.
"हो पण मला एक कळत नाही आहे कि ही महत्वाची कागदपत्रे आपल्याला पाठविणारा हा धनंजय बुरले नावाचा व्यक्ती तरी कोण आहे?" बाबा प्रश्नार्थक स्वरात विचारतात.

मिथीला ह्या सर्व गोष्टींचा काल रात्रीपासूनच विचार करीत असते. त्यामुळे तिची नीट झोप सुधा झालेली नसते. आताही ती त्याच विचारात मग्न असते.

"बाबा, मला आठवलय हे धनंजय बुरले कोण आहेत ते." मिथिला अचानक उत्तरते.
"कोण?"

"आपण मागच्या वेळेस मोरव्याला गेलो होतो. तेथून वापस येताना आपण एका गावकऱ्याला आपल्या गाडीत लिफ्ट दिली होती. त्याने आपलं नाव धनंजय सांगितल्याच आता लक्ष्यात येत आहे माझ्या." 

"कोणता गावकरी? मला तर काहीच आठवत नाही आहे." बाबा उत्तरतात.

"ते जोडपं होतं आणी त्यांच्या तान्हा बाळाला ताप आला होता. आपण नाही का त्यांना आपल्या गाडीत लिफ्ट दिली आणी त्यांना आपल्या इथल्या मेहेरा हॉस्पिटलला सोडले."

"हा हा तो गावकरी खूप गयावया करीत होता, हा आता आठवलं, पण तोच धनंजय बुरले असेल कश्यावरून?" बाबा विचारतात.

"त्याने आपलं नाव धनंजय सांगितल्याच स्ट्राईक होतंय मला."

"अगं तो तर त्या तलाठी कार्यालयातील कारकून होता ना? किती हेकेखोर आणी नालायाकपणे  वागला त्या दिवशी आपल्याशी आणी तू म्हणतेस कि त्याने आपल्याला हि कागदपत्रे पाठविली असेल.? शक्यच नाही." विजयराव विचारतात.

"हो काका. मला तरी वाटतं कदाचित त्यानेच पाठविली असणार."

"अगं, त्याची तर त्या तलाठ्यासोबत मिलीभगत होती असं वाटतं, मग तो कश्याला आपल्याला मदत करेल?" विजयराव उत्तरतात.

"आपण एक काम करूया, प्रत्यक्षात मोरव्यालाच जाऊ या. त्याशिवाय हा प्रश्न काही सुटायचा नाही." बाबा उत्तरतात.

ते तिघेही तातडीने विजयरावांच्या गाडीने 50 किमी अंतरावर असणाऱ्या मोरव्याला निघतात. गाडी सरळ तलाठी ऑफिसजवळ येऊन थांबते परंतु रविवार असल्याने ऑफिस बंद असते. गावात थोडी विचारपूस केल्यावर धनंजयच घर मिळतं. धनंजयचा चेहरा पाहिल्यावर तिघांनाही लगेच लक्ष्यात येतं कि हा तोच व्यक्ती आहे ज्याला आपण त्या दिवशी लिफ्ट दिली होती.

"होय साहेब, मीच पाठविले ते कागदपत्र आपल्याला."

"अरे पण त्यादिवशी आम्ही ह्याच कागदपत्राकरिता तुझ्या दफ्तरात आलो तेव्हा तर बुवा तुझं वागणं काही वेगळंच होत." विजयराव विचारतात.

"माफ करा साहेब, खूप मोठी चूक झाली हातून. पैश्याने मला आंधळे बनविले होते. थोड्या पैश्याच्या  हव्यासापोटी मी हे सगळं करीत होतो. पण आता मला माझी चूक लक्ष्यात आली आहे."

"असं काय घडलं ज्याने तुझ्यात एवढा बदल झाला?" बाबा विचारात्त. (क्रमश:)

भाग- 2 वाचा.