18 October, 2015

आता तिथे गाव नाही.

चहूबाजूंनी हिरव्यागार वनराईने नटलेलं 500- 600 लोकवस्तीच गाव. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातलं. बहुतेक घरे मातीच्या भिंतीला शेणाने सारवून त्यावर कौलारु छप्पर असलेली. त्यात राहतात राखडी माणसे. अगदी रंगाने आणी स्वभावाने देखील. राधाबाई तेंदूपत्ता गोळा करते. वामनराव बांबू कटाई करतात. यादव कडे आहेत काही  गाई- म्हशी. रोज गावाला दुध पुरवणं त्याच काम.

गावातून रोज सकाळी चुलीचा धुर निघतो. लाईट आहे गावात. दूरदर्शन आणी BSNL पण पोहोचलय गावात. आता तर व्याघ्र प्रकल्पातील वाघं सुधा पोहोचतात तिथे. मागे काही बकऱ्या नेल्या त्याने. एका बाईवरही हल्ला केला होता. मग गावकरी देखील ह्या सगळ्या गोष्टीसाठी सज्ज असायचे. वाघासारख्या जनावराचा प्रतिकार करायचे. मोठे हिम्मतवान होते ते. पण शासनान एक नवं धोरण जाहीर केलं आणी सारा पटच बदलला.

वर्षभरापुर्वीच हे गाव सरकारने बफर क्षेत्रात घातलं. वाघांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणी त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून हे आणी असेच लगतचे बफर क्षेत्रातले काही गावं उठविण्याचा सरकारने निर्णय घेतला. साऱ्या गावाला धक्का बसला. फॉरेस्टच्या मोठ्या अधिकाऱ्यापासून तर NGO वाल्यापर्यंत सारेजण गावात येरझारा घालू लागले. काही ह्या गोष्टीच्या समर्थनात तर काही विरोधात होते.

मोठाले अधिकारी, कर्मचारी, पोलीस गावात धडकले. कारवाई सुरु झाली. गावकऱ्यानी विरोध केला. कालपर्यंत विरोध करणारे NGOवाले आज कुठेच नव्हते. बळी तो कान पिळी करत प्रशासनाने सारा गाव भुइसपाट केला. लोकांसोबत मुक्या जनावरांना सुद्धा पिटाळून लावले. बफर क्षेत्राबाहेरील एका गावात गावकऱ्यांसाठी छावणी लावून साऱ्यांना त्यात कोंबले. आपले पुनर्वसन होईल ह्या आशेवर महिनोंमहिने निघून गेले पण पुनर्वसनाचा मुहूर्त काही सरकारला अजुनही सापडलेला नाही.

आता तिथे शेणा-मातीची कौलारू घरे नाही. चुलीतून धुर निघत नाही. दूरदर्शन पाहणारं देखील कुणी नाही. आता राधाबाई तेंदुपत्ता गोळा करीत नाही. वामनराव बांबू कटाई करीत नाही. यादव कडे आता एकच म्हैस उरली आहे. त्याचा मुलगा नुकताच इंजिनियर होऊन गावात आला. घर तर सोडा गाव देखील पाहणं त्याच्या नशिबी नव्हतं. आता तिथे उरलं आहे फक्त भयाण जंगल. आता तिथे वाघ पण येत नाही कारण त्यांना मिळणारा बकऱ्यांचा पाऊनचार आता तिथे होत नाही. आता तिथे गावच नाही.

© Aniket Bhandakkar.