31 March, 2023

निरोप समारंभ कविता | Send Off Poem in Marathi

Send Off Poem in Marathi

बरेच दिवस झाले, वर्ष झाले काही लिहिलं नाही. कथा नाही, कविता नाही, एवढच काय तर एखादी चारोळी पण नाही. रोजच्या स्पर्धेत आणि जगण्याच्या धावपळीत आवड, छंद कुठे, कसा मागे पडला कळलेच नाही. कालांतराने पैसाच आवड, छंद, गरज सर्वकाही होऊन जातो. कलेने मानसिक भूक भागेलही पण पोटाची भूक, आर्थिक भूक भागवायला पैसाच लागतो हेच सत्य आहे. पण तरीही कलेसाठी, छंदासाठी वेळ काढायला पाहिजे हे देखील गरजेचं आहे.

आज कविता लिहायला एक निमित्य झाल, ते असं की, मित्राच्या ऑफिसमधील एक सहकारी निवृत्त होणार होता आणि त्यांच्या निरोप समारंभात मित्राला एक निरोप कविता त्यांच्यासाठी म्हणायची होती. त्याने मला ह्यावर एक कविता लिहिण्याची विनंती केली. वर सांगितल्या प्रमाणे वर्ष उलटले असतील मी काहीच लिहिले नव्हते, त्यामुळे शब्दच सुचत नव्हते. तरी प्रयत्न केला आणि खालीलप्रमाणे कविता झाली....

(निरोप समारंभात निरोप घेणार्‍या सहकार्‍याला उद्देशून )

निरोप समारंभ कविता | Send Off Poem in Marathi 


वर्षनुवर्षं काम केल्यावर, एक दिवस असा येतो,

नाईलाजाने का असेना, मनुष्य निरोप घेतो. 


मागे सुटतात ती कामे, जी रोज आपण करायचो,

मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना, आपण एकत्र लढायचो. 


आमुचे एक सहकारी आज, आम्हास सोडून जात आहे,

दुःख झाले मनाला खुप, जरी हे सर्व मला ज्ञात आहे. 


एवढ्या वर्षात त्यांच्याकडून, खूप काही शिकायला मिळाले,

प्रामाणिकपणे काम कसं करावं, हे त्यांच्याकडून कळाले. 


कोणतेही काम हसत हसत करण्याची, त्यांच्यात होती कला,

त्यांची हीच कला, अवगत करायची आहे मला. 


डोक्यावर बर्फ अन तोंडात साखर, हाच त्यांचा मंत्र आहे,

त्यांच्यासारखं काम करणे, हेच यशाचं तंत्र आहे. 


असे सहकारी आम्हास लाभले, हेच मी माझे भाग्य समजतो,

त्यांच्या निरोप समारंभात दोन शब्द बोलायला मिळाले,

हे मी माझे सौभाग्य समजतो.


No comments:

Post a Comment