09 September, 2019

अनकंट्रोल्ड- भाग 2



पहिला भाग- येथे वाचा 


विराट वरच्या फ्लोअरला आपल्या नवीन कॅबिन मध्ये गेला. पूर्वीच्या कॅबिनपेक्षा मोठी कॅबिन होती ती. त्याने संपूर्ण कॅबिनमध्ये नजर फिरविली. AGM बनणं त्याचं स्वप्न होत पण ते इतक्या लवकर पूर्ण होईल असं त्याला वाटलं नव्हतं. तिथे असलेल्या त्या एक्सिक्युटिव्ह चेयर वर तो बसला. अकाउंटंट पासून तर AGM पर्यंतचा सगळा प्रवास त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला. तेवढ्यात कुणीतरी दारावर नॉक केलं.

"येस, कम इन" विराट उत्तरला.

ती ओजस्वी होती. तिला बघताच विराटच्या हृदयाचे ठोके वाढले. जेव्हा केव्हा विराटची नजर तिच्या नजरेला मिळे तेव्हा त्याची हार्टबिट वाढत असे. तिच्या सोबत पन्नाशीच्या आसपासचे एक गृहस्थ होते.

"हे ऍड. घोष, आपल्या प्रोजेक्टचे लिगल अडव्हाईजर." ओजस्वीने त्यांची ओळख विराटसोबत करून दिली.

"ओह्ह, हॅलो सर, मी विराट.." विराटने त्यांच्यासोबत हात मिळवत उत्तर दिले.

"हो, मला सांगितलं सर्व ओजस्वीने" ऍड. घोष उत्तरले.

"विराट सर, तुम्हीं ह्या प्रोजेक्टचा बराच अभ्यास केला आहे असं बाबांनी आय मिन रेड्डी सरांनी सांगितलं मला" ओजस्वी विराटला म्हणाली.

"तुम्ही मला फक्त विराट म्हटलेलं जास्त आवडेल मला" विराटने हलकेसे हास्य करत उत्तर दिले.

"एवढ फार्मल वागण्यापेक्षा आपण फ्रेंड म्हणून वागू एकमेकांशी, त्याने आपली प्रोजेक्टमधील सहजता वाढेल" घोष मध्येच उत्तरले. त्यावर दोघांनीही सहमती दर्शविली.

"हो, मागील काही महिन्यांपासून मी वेदिका ऑटोची बरीच माहिती काढली आहे," विराटने आपला लॅपटॉप उघडत सांगितले.

"हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आपल्यासाठी आणि ह्यावरच आपल्या कंपनीच्या बऱ्याचश्या गोष्टी अवलंबून असेल पुढे" ओजस्वी उत्तरली.
विराटने लॅपटॉपमधील वेदिका ऑटोची फाईल उघडली.

"वेदिका ऑटो, ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने वाढणारी भारतीय कंपनी. 1995 ला 'विनोद शर्मा' ह्यांनी एका गॅरेजमध्ये या कंपनीची स्थापना केली. त्यांचे वडील मेकॅनिक होते आणि त्यांचं एक गॅरेज होतं. मिस्टर शर्मा लहानपणीपासूनच त्या गॅरेजमध्ये जात. तिथेच त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातले बारकावे शिकून घेतले. नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्स केले. आधी स्पार्क प्लग, मग गाडीचे इतर पार्ट आणि नंतर गाडीचं इंजिन त्यांनी तयार केलं. सुरुवातीला त्यांच्या कार मध्ये जपानी टेक्नॉंलॉजीचे इंजिन असे, नंतर त्यांनी हुशार इंजिनियर्सच्या मदतीने भारतीय बनावटीचे इंजिन तयार करून घेतले आणि आपल्या कार मध्ये वापरायला सुरुवात केली. त्यांच्या भारतीय बनावटीच्या इंजिनला देशात चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि मग त्यांच्या 'वेदिका ऑटो'ने ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली" विराट तळमळीने सर्व सांगत होता.

"म्हणजे ह्या माणसाने शून्यातूनच विश्व उभं केलं तर" ऍड. घोष उत्तरले.

"हो, प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी ही कंपनी इथवर आणली. आता त्यांची दुसरी पिढी या कंपनीत उतरली आहे. 'वेदान्त शर्मा' हा त्यांचा मोठा मुलगा. त्याने देखील मेकॅनिकल मध्ये मास्टर्स केलं आहे. तो आता ह्या कंपनीत डायरेक्टर आहे. प्रोडक्शन विभागाच सर्व काम तोच बघतो" विराट सांगत होता.

त्याला मधेच थांबवत ओजस्वीने विचारलं,"मला सांग, मग हे वेदिका नाव कुणाच्या नावावरून ठेवलं असेल.?"

"ह्या सर्व प्रवासात मिस्टर शर्मा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आणि पावलोपावली त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी 'वेदिका शर्मा' हिच्या नावावर" विराट ने उत्तर दिलं.

"मग त्या पण कंपनीच्या बॊर्डावर असेलच कि" ऍड. घोष नी अंदाज वर्तविला.

"हो, त्या कंपनीच्या MD म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आहे. विनोद शर्मा हे 'चेयरमन' आहेत. पण कंपनीचे सर्व निर्णय हे वेदिका मॅडमच घेतात. त्या कडक शिस्तीच्या आणि आक्रमक स्वभावाच्या आहेत.  त्यांनी एखादी गोष्ट मिळवायची ठरवली कि त्या ती गोष्ट मिळवितातच. आपल्याला हा प्रोजेक्ट मिळवायचा असेल तर आपल्याला वेदिका मॅडमला इम्प्रेस करणे फार गरजेचे आहे. त्या इम्प्रेस झाल्या म्हणजे हा प्रोजेक्ट आपल्याला मिळलाच म्हणून समजा. पण त्यांना इम्प्रेस करणे इतके सहज सोपी नाही." विराट सांगत होता.

"मग हा प्रोजेक्ट आपल्याला कसा मिळेल? त्यासाठी काय करावं लागेल?" ओजस्वीने प्रश्न केला.

"बघ, वेदिका ऑटो हि फार मोठी कंपनी आहे. त्यांच्या प्रत्येक विभागाचे काम चालविण्यासाठी ते वेगवेगळी सॉफ्टवेयर वापरतात. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळं सॉफ्टवेयर वापरतं, HR विभाग वेगळं सॉफ्टवेयर वापरतो, सेल्स आणि डिस्टिब्युशन वाले वेगळं वापरतात आणि फायनान्स वाले वेगळं वापरतात..."

"मग ह्यात काय प्रॉब्लेम आहे?" ओजस्वीने मध्येच प्रश्न उपस्थित केला.

"ह्यात एकच प्रॉब्लेम आहे तो असा की, हि सगळी वेगवेगळी सॉफ्टवेयर असल्याने ती एकमेकांना कनेक्टेड नाही. म्हणजे जर सेल्स विभागाने गाड्या विकल्या तर त्याची माहिती फायनान्स विभागाला होत नाही जो पर्यंत सेल्स वाले फायनान्स वाल्यांना कळवत नाही. तसच इतर विभागाचआहे. हे सगळं आटोमॅटिक होत नाही, मॅन्युअली करावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टीत ताळमेळ साधण्यासाठी फारच तारेवरची कसरत करावी लागते" विराट शांतपणे समजावत होता.

"म्हणजे त्यांनी अजून ERP (Enterprise Resource Planning) प्रणाली वापरायला सुरुवात केली नाही आहे अजून तरी" ऍड. घोष मधेच उत्तरले.

"हो अगदी बरोबर, आणि हीच आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे कारण आपण नुकतेच एक ERP सॉफ्टवेयर बनविले आहे आणि हि कंपनी आपल्यासाठी अगदी योग्य ग्राहक असणार आहे." विराट उत्साहात सांगत होता.

"पण एका सॉफ्टवेयरसाठी आपण त्या कंपनीला इतकं महत्व देतोय? म्हणजे हा प्रोजेक्ट इतका महत्वाकांक्षी असण्याचं कारण नाही कळलं मला?" ओजस्वीच्या ह्या प्रश्नात एक कुतूहल जाणवत होतं विराटला.

"बघ, इथेच आपल्या दूरदृष्टीचा खरा कसं लागतो. गोष्ट फक्त एक सॉफ्टवेयर विकण्याची नाही आहे" हलकेसे हास्य करीत विराटने उत्तर दिले.

"मग काय आहे?" ओजस्वीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

"मला वाटते आपण कॉफी घ्यायला पाहिजे आता, घेणार ना तुम्ही दोघे पण?" विराटने विचारले.

"हो, मी पण आता तेच म्हणणार होतो" ऍड. घोष म्हणाले.

विराटनी बेल वाजविली. ऑफिसबॉय ला तीन कॉफी आणायला सांगितलं. कॉफी आली आणि पुढच्या चर्चेला सुरुवात झाली.

"बघ, आपल्याला वेदिका ऑटोला फक्त ERP सॉफ्टवेयर विकायचं नाही आहे, तर त्यांचा खूप मोठा डेटा आहे ज्याची आपल्याला डाटाबेस मॅनेजमेंटची काँट्रॅक्ट सुद्धा मिळू शकेल आणि तो डेटा आपल्याला हाताळता देखील येईल. तसेच त्यांच्या कंपनीत वापरल्या जाणाऱ्या भरपूर मशिनरीज आहे त्यांना हाताळण्याकरिता अद्यावत स्वरूपाच्या सॉफ्टवेयरची गरज पडते आणि ते काम पण आपल्याला मिळू शकतं, तसेच हि ऑटोमोबाईल क्षेत्रातली खूप मोठी कंपनी आहे त्यामुळे त्यांच बघून इतरही ऑटोमोबाईल कंपन्या आपल्याला काम देतील, शिवाय या ऑटोमोबाईलचे सुटे भाग बनविणाऱ्या देखील बऱ्याच कंपनिज आहेत ..."

"म्हणजे आपल्याला इथे भरपूर वाव आहे तर" ओजस्वी मधेच उत्तरली.

"आणि विनोद शर्मा हे राजकारणात सक्रिय आहे तर त्यांची पण आपल्याला मदत होईलच" ऍड घोष ने पुष्टी जोडली.

"अगदी बरोबर, हेच म्हणायचं होतं मला" विराटने उत्साहात प्रतिक्रिया दिली.

"पण बाबांचे पण चांगले पोलिटिकल कनेक्शन आहेतच कि."

"हो, पण सध्याचे जे सरकार आहे त्यांच्याशी मिस्टर शर्माचे जास्त जवळचे संबंध आहे आणि आपल्यामागे जो कॉर्पोरेट टॅक्सचा जो ससेमिरा लागला आहे त्या प्रकरणात आपल्याला मिस्टर शर्माची चांगलीच मदत होईल." विराट शांतपणे समजावत होता.

"म्हणजे काहीपण करून शेवटी हा प्रोजेक्ट मिळविणे गरजेचे आहे आपल्यासाठी" ओजस्वी उत्तरली.

"अंतर्गत स्रोतानुसार मला कळालं आहे की, ह्या रेस मध्ये चार ते पाच कंपन्या असतील. यात एक जर्मनीची ERP क्षेत्रातील बलाढ्य कंपनी पण आहे. तिच्यासोबत आपली खरी टक्कर असेल. त्या जर्मन कंपनीला मात देऊन आपल्याला जर हे प्रोजेक्ट मिळवायचं असेल तर आपल्याला खूप चांगल्याप्रकारे तयारी करावी लागेल." विराट लॅपटॉपमधील आकडेवारी दाखवत सांगत होता.

"म्हणजे मला तांत्रिक बाबींची फारच चांगल्या प्रकारे तयारी करावी लागेल." ओजस्वीने विराटच्या थेट नजरेला नजर भिडवून म्हटले.

"आपल्या सर्वांनाच खूप चांगल्याप्रकारे तयारी करावी लागेल" ऍड. घोष नी प्रतिक्रिया दिली.

"हो, येत्या सोमवारी आपलं प्रेझेन्टेशन असेल आणि आज मंगळवार आहे म्हणजे पाच सहा दिवसच आपल्या हातात आहे तर, त्यामुळे रोज आपण लंच नंतर भेटत जाऊ जेणेकरून काही प्रश्न किंवा प्रॉब्लेम असतील तर ते आपण सोडवू शकू." विराटने दोघांकडेही एक नजर टाकत म्हटले.

दोघांनीही सहमती दर्शविल्यावर विराटने लॅपटॉप बंद केला. ऍड. घोष यांनी पण निरोप घेतला. आता फक्त ओजस्वी आणि विराट , दोघेच तिथे होते. विराट जागेवरून उठला, लॅपटॉपची बॅग घेतली आणि त्यात लॅपटॉप आणि चार्जर टाकू लागला. ओजस्वी हे सगळं शांतपणे पाहत होती. अचानक विराटचं लक्ष ओजस्वीकाडे गेलं, "अरे तू नाही गेली अजून"

"तू म्हणत असेल तर जाते मी आताच" ओजस्वीने मस्करीत उत्तर दिलं.

"अरे तसं म्हणायचं नव्हतं मला, मला वाटलं घोष सरांसोबत तू पण निघाली असणार" विराटने स्वतःला सावरत उत्तर दिलं.

"म्हटलं एकाच प्रोजेक्टमध्ये आहो तर थोडी ओळख करून घेऊ या, पण खरंच, तू बाबांनी म्हटल्यासारखाच आहेस."

"म्हणजे.?" विराटने प्रश्न केला.

"म्हणजे बाबा सांगत होते की तू फार फोकस्ड आहेस. तुला तुझ्या कामातले पूर्ण बारकावे माहित असतात. तू कुणाशी पण स्वतःबद्दल कमी आणि कामाबद्दल जास्त बोलतो. तुझी इतरांना समजाविण्याची कला फार उत्तम आहे. तुझ्या कामात त्यांना नेहमी आत्मविश्वास जाणवतो." ओजस्वी सांगत होती.

"अरे वाह, मला रेड्डी सरांच्या ह्याच विश्वासावर खरं उतरायचं आहे. परफेक्ट नाही पण परफेक्शनच्या जवळ पोहोचायचं आहे.    आपल्या क्षेत्रात आपला हात कुणीच पकडणार नाही इतकं नॉलेज घ्यायचं आहे. फक्त नाव एकूणच सर्व कळेल म्हणजे परिचय देण्याची गरज पडणार नाही असं बनायचं आहे." आता विराट खुलला होता आणि मनमोकळेपणे ओजस्वीशी बोलत होता.

"फार छान विचार आहे तुझे, तू नक्कीच तुझी स्वप्न पूर्ण करशील पण एक नेहमी लक्षात असू दे कि ह्या धावपळीत, या स्पर्धेत आपले कुठे मागे तर सुटून जात नाही आहे ना ह्याकडे लक्ष असू दे. कारण शिखरावर पोहोचल्यावर जर आपण एकटेच असू तर विजयाचा आनंद पण पुरेपूर घेता येत नाही. मग आपल्या व्यक्तीविना सारंच बोथट वाटायला लागतं." ओजस्वी अगदी मनापासून बोलत होती. बोलताना तिची तंद्री लागली होती पण विराटच्या मध्येच बोलण्याने ती भानावर आली.

"बापरे, तू एवढ्या खोलात जाऊन विचार करतेस असं वाटलं नव्हतं मला." विराटने स्मित करत म्हटले.

"कुणालाच नाही वाटत, एकंदरच माझं शिक्षण, राहणीमान, संस्कार सगळं उच्च वातावरणात झालं. घरी बिजनेसचं वातावरण. मी उच्च शिक्षण घ्यावं, MBA करावं आणि नंतर आपली कंपनी सांभाळावी हि बाबांची इच्छा. त्यांनीच मला शिक्षणासाठी हावर्डला पाठविले. आणि आता मी कंपनी जॉईन करावं हि त्यांचीच इच्छा." ओजस्वी शांतपणे सर्व सांगत होती.

"एक मिनिटं" ओजस्वीला मध्येच थांबवत विराटने प्रश्न केला, "त्यांची इच्छा, म्हणजे मग तुझी काय इच्छा होती.?"

"जाऊदे रे, त्या गोष्टीला काही महत्व नाही आता" ओजस्वीने नाराजीच्या स्वरात म्हटले.

"अग प्लिज सांग ना, सांगायला काय प्रॉब्लेम आहे?" विराटने अगदी विनवणी करीत विचारले.

"मला साहित्यात मास्टर करायचे होते."

"काय.?साहित्य.?" विराटने शॉक होत विचारले.

"हो साहित्य, मला नाही कळत रे हे कोडिंग डिकोडिंग, फायनान्स, शेयरमार्केट, डावपेच इ. मला तर लोकं समजून घ्यायाची आहेत, त्यांचं मन, विचार, सुख दुःख, भावना इ. गोष्टी समजून घेण्यात जास्त रस आहे मला." ओजस्वीने आपलं मन मोकळं केलं.

"व्वाव यार!" विराट आश्चर्याने  उत्तरला आणि विचारले, "म्हणजे तू साहित्यिक आहेस. मग लेखिका कि कवयित्री? कि दोन्ही?"

"कुठे रे, लिहिणं तर केव्हाच बंद करून टाकलं मी" ओजस्वी नाराजीच्या स्वरात म्हणाली.

"अग लिखाण तरी सुरु ठेवायचं असतं. घरून कुणाचा सपोर्ट नाही मिळाला का कधी?" विराटने काळजीने विचारलं.

"कसला सपोर्ट? अरे आम्ही रेड्डी, मूळचे आंध्रतले. आमच्या कुटुंबातल्या सर्वांना सॉफ्टवेयर आणि फायनान्समध्ये रस. त्याच्यात करियर म्हणजे प्रतिष्ठा. साहित्यिक होणं, कविता करणं तर कुणाच्या खिजगीनतीतही नाही. विचार सुद्धा नाही करत कुणी तिकडे वळण्याचा." ओजस्वीने उत्तर दिलं.

"मग तू कशी काय इकडे वळालीस.?"

"मला साहित्याची आवड निर्माण होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे, 'निदा फाजली'..."

"निदा फाजली.?" विराटने प्रश्न केला.

"खूप मोठे शायर होते ते, त्यांची शायरी म्हणजे जीव कि प्राण माझ्यासाठी, कॉलेजात असताना एकदा त्यांच्या शायरीच पुस्तक आलं वाचण्यात आणि बस, खेळ खल्लास...मी प्रेमातच पडले त्यांच्या, त्यांच्या शायरीच्या. मग झपाटल्यासारखं त्याचं सर्व साहित्य वाचून काढलं. मग काय, आता रक्तातून निदा फाजली वाहतात. मग वाचन, लिखाण बंद झालं पण निदा फाजली आहेत अजून श्वासात." आता ओजस्वीचा चेहरा प्रसन्नतेने फुलला होता. जणू ती त्यांच्या विचारताच रमून गेली होती.

"मग तू पण बऱ्याच शायऱ्या लिहिल्या असणार."

"नाही रे, कॉलेजच्या दिवसात काही लिहिल्या होत्या, पण आता तर लिहिणं बंद आहे" ओजस्वी उत्तरली.

"अरे वाह ! मग सांग ना त्यातली एखादी शायरी" विराट आनंदाने म्हणाला.

"नाही रे बाबा, त्या तेव्हा लिहिलेल्या, आता फार बालिश वाटतात त्या."

"अग तर काही हरकत नाही, मला कुठे इतकं कळते शायरीतलं, मला फक्त ऐकायची आहे, तुझी शायरी तुझ्या तोंडून" विराटने विनंती केली. तेवढ्यात दारावर कुणीतरी नॉक केलं.

"मॅडम, तुम्हाला रेड्डीसर बोलवत आहे" ऑफिसबॉयने सांगितलं.

"ओके, आलेच" ओजस्वीने त्याला उत्तर दिलं.

"ओजस्वी, एवढी चांगली मिटिंग झाली, त्यानंतर आपलं एवढ बोलणं पण झालं, आता याची सांगता तुझ्या शयरीने करून जा ना, म्हणजे दुधात साखरेचा खडाच समजेल मी" विराटने थेट ओजस्वीच्या डोळ्यात डोळे घालून तिला विनंती केली. या वेळेस ओजस्वी पण त्याला नकार नाही देऊ शकली.

"ठीक आहे" ओजस्वीने होकार दिला. विराटला फार आनंद झाला. ती चार पाच सेकंद शांत राहिली आणि मग...

"मुठ्ठीसे दाना गिरता गया
और फसल उगती गयी,
तुम बाप का नाम ना दे पायें
वो हर माँ झुकती गयी।"

"वाह वाह ! काय मस्त शायरी होती" विराटने दाद दिली. खरंतर त्याला शायरी काही कळली नव्हती पण द्यायची म्हणून त्याने दाद दिली.

"चल निघते मी, भेटू आपण नंतर, बाय" असं म्हणून ओजस्वी उठली आणि जायला निघाली.

"अग ओजस्वी, एक मिनिटं" विराटने आवाज दिला.

"हा बोल, विराट"

"खरं सांगू, मला हे शायरीतलं फार काही कळत नाही, मी कधीच शायऱ्या, कविता, कथा, कादंबऱ्या वाचल्या नाही. जेव्हा पण  वाचली फक्त अभ्यासाचीच पुस्तकं वाचली. तू प्लिज मला सांगशील का कि हि शायरी कश्या संबंधी आहे? मला समजून घायचं आहे साहित्य, शायरी, कविता. फक्त हिंट दे, सॉरी हा."

"अरे, तू सॉरी कश्याला म्हणतोस, सुरुवातीला कुणालाच नाही कळत, जितकं जास्त वाचन केलं तितका माणूस प्रगल्भ होत जातो. हि शायरी माझ्या आवडत्या शयरीतली एक आहे. या शयरीबद्दल मी एवढंच सांगेल कि हि शायरी 'कुमारी मातां'वर आहे." असं म्हणून ओजस्वी निघून गेली.

विराटने शायरी पुन्हा आठवली. सरकन त्याच्या शरीरातून एक लहर डोक्याकडे गेली. अंगावर काटा आला. शहारला तो. ह्या शयरीचा अर्थ किती खोल होता हे कळाले होते त्याला. ओजस्वीची हि प्रगल्भता पाहून तो स्तब्ध झाला होता.

क्रमशः

तीसरा भाग- येथे वाचा.

No comments:

Post a Comment