24 September, 2019

अनकंट्रोल्ड- भाग 4



तिसरा भाग- येथे वाचा.

सगळे सकाळीच ऑफिसला पोहोचले. तिथून तिघेही सोबत प्रेझेंटेशनसाठी वेदिका ऑटोच्या मुख्यालयात गेले. प्रशस्त अश्या जागेवर वेदिका ऑटोची मोठी बिल्डिंग होती. बिल्डिंगच्या गेट मधून आत शिरताच समोर मोठा हॉल आणि त्याच्या अगदी मधोमध वेदिका ऑटोची सर्वात महागडी आणि महत्वाकांक्षी असलेली कार तेथे ठेवली होती. रिसेप्शनवर विचारपूस झाल्यावर एक सुंदर एक्सिक्युटिव्ह तेथे आली आणि त्यांचं स्वागत करून त्यांना मिटिंग हॉल असलेल्या फ्लोवरवर घेऊन गेली. ऑफिस अगदी चकाचक होतं. सगळीकडे सुव्यवस्थित सूटाबुटात असलेले कंपनीचे एक्सिक्युटिव्ह दिसत होते. वेल मेंटेन, हसरे आणि आदरातिथ्य करणारे.

विराट, ओजस्वी आणि ऍड. घोष कॉन्फरन्स हॉलमध्ये शिरले. वेदिका ऑटोमध्ये डायरेक्टर असणाऱ्या वेदान्त शर्मानी त्यांचे स्वागत केले. बाकीचे डायरेक्टर आणि डिपार्टमेंट हेड अंडाकृती राउंड टेबलवर एका बाजूला बसले होते. हे तिघेही त्यांच्या समोरच्या बाजूला बसले. काही वेळातच विनोद आणि वेदिका शर्मा तिथे आल्या आणि त्यांनी हस्तांदोलन आणि गालाला गाल लावून एकमेकांचे स्वागत केले. सर्व सोपस्कार पार पाडले आणि प्रेझेन्टेशनला सुरुवात झाली.

ओजस्वीने प्रेझेन्टेशनला सुरुवात केली. कंपनीची माहिती, त्याचा उद्देश, कंपनीचे प्रॉडक्ट्स, ERP प्रणाली, तिचा उपयोग इ. सर्व तांत्रिक माहिती तिने सांगितली.

"आम्ही तुमच्याच कंपनीची ERP प्रणाली का वापरावी? मार्केटमध्ये इतरही ERP सॉफ्टवेयर आहे, ते का वापरू नये?" वेदान्तने प्रश्न केला. ओजस्वीला हा प्रश्न अपेक्षितच होता.
ओजस्वीने प्रोजेक्टरवर एक प्रेझेन्टेशनची स्लाईड उघडली आणि  त्यावरील माहिती समजावत म्हणाली," कुठल्याही कंपनीची ERP प्रणाली पहिल्यावेळेस वापरतांना सर्वात मुख्य कुठली गोष्ट असेल तर ती आहे 'डेटा मायग्रेशन'ची. म्हणजे आधीच्या सॉफ्टवेयरमध्ये वापरत असलेला डेटा हा आपल्याला ERP सॉफ्टवेयरमध्ये घ्यावा लागतो. जर का हा डेटा व्यवस्थित आला नाही तर पुढे ERP प्रणाली बरोबर काम करणार नाही. आमचं ERP सॉफ्टवेयर सर्व जुन्या सॉफ्टवेयर फाईल एक्सटेन्शनला सपोर्ट करते शिवाय ऑटो सेटअपच्या माध्यमातून जुन्या सॉफ्टवेयरचा डेटा व्यवस्थितपणे ERP मध्ये अपलोड करते.  त्यासाठी आम्ही DBMS, डेटा इंटरचेंज प्रोटोकॉलवर विशेष लक्ष दिला आहे. त्याच बरोबर आमचे ERP सॉफ्टवेयर खूप सारे बदल (Customization) करण्यास परवानगी देते म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने सॉफ्टवेयरमध्ये बदल करून घेऊ शकता."

ओजस्वीच्या ह्या उत्तराने वेदान्त समाधानी झाला असेल असं वाटत होतं. त्यानंतर वेदिका मॅडम, टेक्निकल डायरेक्टर आणि इतरांनी देखील अनेक टेक्निकल बाबींसंबंधी प्रश्न विचारले. ओजस्वीने त्या सर्वांच्या प्रश्नाला अगदी शांतपणे आणि अतिशय विस्तृत पद्धतीने उत्तरे दिली. तिचं तांत्रिक ज्ञान वाखण्याजोगं होतं. या पाच सहा दिवसात तिने बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या होत्या. विराटदेखील तिचं प्रेझेन्टेशन पाहून तिच्यावर इम्प्रेस झाला होता. त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तिने स्वतःला प्रेझेंट केलं होतं.

लंचब्रेक झाला.
"वाह! ओजस्वी, काय मस्त प्रेझेन्टेशन दिलंस, फाड दिया तूने तोह।" ऍड. घोष अगदी उत्साहात म्हणाले.

"थँक्स सर, मला पण वाटलं नव्हतं मी एवढं बोलू शकेल म्हणून," ओजस्वीने हलकेसे स्मित करत उत्तर दिले.

"तयारी प्रामाणिकपणे केली की रिझल्स आपोआप मिळतात," विराटने उत्तर दिले.

"आता तुझी टर्म असेल आणि तुला पण तेच करायचं आहे जे ओजस्वीने केलं" विराटच्या खांद्यावर हात ठेवत ऍड. घोष म्हणाले.

"विराटचं प्रेझेन्टेशन माझ्यापेक्षाही चांगलं होईल सर, बघाच तुम्ही" ओजस्वी विराटवर विश्वास दाखवत उत्तरली.

विराटने प्रेमाने ओजस्वीकडे बघितलं आणि म्हणाला, "खरंतर तुझ्याकडून मला आता खुप शिकायला मिळालं."

तेवढ्यात वेदिका मॅडम तिथे आल्या. त्यांनी ओजस्वीच अभिनंदन केलं आणि म्हणाल्या," मिस्टर विराट, आता मला तुमच्या प्रेझेन्टेशनची उत्सुकता लागली आहे. आमच्या गरजेवर तुम्ही खरं उतरणार अशी आशा करते."

"ऑफकोर्स मॅडम, तुम्हाला नाराज होऊ देणार नाही याची गॅरंटी" विराट अगदी शांततेने म्हणाला.

सगळे कॉन्फरन्स हॉल मध्ये गेले आणि विराटचे प्रेझेन्टेशन सुरु झाले. विराटने सर्व आर्थिक बाबी, शेयरचे भाव, बॅलन्सशीट, टॅक्स ई. बद्दल सर्वच माहिती दिली. कंपनीची आर्थिक बाजू सद्या थोडी कमजोर होती आणि त्यावर प्रश्न पडणार म्हणून विराट आधीच तयार होता.

"सलग दोन वर्षे तुम्ही लॉस (नुकसान) मध्ये होता, का बरं.?" वेदिका मॅडमने थेट प्रश्न केला.

"कुठलीही कंपनी म्हटली की चढ उतार आलेच आणि त्यातल्या त्यात मल्टीनॅशनल सॉफ्टवेयर कंपनी म्हटली की जास्तच, कारण सॉफ्टवेयर बिझनेस हा आपल्या स्वतःच्या देशापेक्षा इतर देशांवर जास्त अवलंबून असतो आणि त्या देशातील आर्थिक बाबींप्रमाणे कंपनीवर त्याचा परिणाम होत असतो" विराट माइकसमोर धडाधड बोलत होता. त्याने प्रोजेक्टरवर एक स्लाईड उघडली आणि तिकडे निर्देश करत म्हणाला, "हा चार्ट बघा, मागील पाच वर्षांचा सेल्स रिपोर्ट आहे हा. दर वर्षी आमचा सेल्स वाढत आहे आणि त्या द्वारे येणारा महसूलसुद्धा परंतु दोन वर्षाआधीच्या बजेटमध्ये सरकारने मल्टीनॅशनल कंपनीवरील कॉर्पोरेट टॅक्स वाढविला. तसेच देशाबाहेर ब्रँचमधून येणाऱ्या महसुलावर कॅपिटल गेंन (Capital Gain) टॅक्स सुद्धा वाढविला त्यामुळे सेल्स वाढून देखील कंपनीला नुकसान सहन करावे लागले." विराटने पद्धतशीरपणे उत्तर दिले.

"मग मधल्या काळात आपल्या कंपनीचा शेयर बराच पडला, त्याच काय कारण आहे?" विनोद शर्मा यांनी प्रश्न केला.

"सर, कोणत्याही कंपनीच्या शेयरचा भाव मुख्यत्वेकरून दोन घटकांवर आधारित असतो. एक, 'कंपनीचा परफॉर्मन्स' आणि दुसरा, 'बाजारातील बातमी'. यातील दुसरा घटक हा शेयरचा किमतीवर खूप जास्त प्रभाव पडतो पण तो काही काळासाठीच असतो. म्हणजे कंपनीसंबंधी सकारात्मक बातमी आली की शेयरचा भाव वाढतो आणि नकारात्मक आली की कमी होतो. दरम्यानच्या काळात सॉफ्टवेयर क्षेत्रसंबंधी बऱ्याच नकारात्मक बातम्या समाजात पसरल्या होत्या, त्यातल्या त्यात सरकारचे धोरण, त्याचा परिणाम म्हणून शेयरचा भाव कमी झाला" विराटने उत्तर दिले.

"पण, तेव्हा तुम्हाला सलग दोन वर्षे लॉस झाला होता म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे 'कंपनीचा परफार्मन्स' ह्या घटकाने देखील तुमच्यावर परिणाम झाला असेलच.?" वेदान्तने प्रश्न केला.

"तसं म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण कंपनीचा परफॉर्मन्स बघून शेयरमध्ये गुंतवणूक करणारे जे लोक असतात ते वित्तीय जाण असणारे लोक असतात. ते फक्त प्रॉफिट किंवा लॉस बघत नाही तर कंपनीचा सेल किती झाला, तो कितीने वाढला, रेव्हेन्यू किती जनरेट झाला, कंपनीचा कॅशफ्लो (Cash Flow) किती आहे, कंपनीने डेट फ्री (Debt Free) आहे का, प्रमोटर्सने आपले शेयर प्लेज (Pledge) केले आहे का, कंपनीची बॅलन्सशीट, वार्षिक अहवाल ई. बऱ्याच बाबी बघतात आणि त्या सर्व बाबतीत कंपनी एकदम मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे फक्त लॉस दिसत आहे म्हणून असले व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स (Value Investors) आपला पैसा कधीच काढणार नाही. त्यामुळे कंपनी परफॉर्मन्समुळे शेयरचा भाव कमी झाला असं म्हणता येणार नाही." वेदान्तकडे पाहत विराटने त्याच्या प्रश्नाचं उत्तर समाप्त केलं.

त्यानंतर इतर डायरेक्ट आणि डिपार्टमेंटल हेड्सनी बरेच प्रश्न विचारले. विराटनी सर्व प्रश्नांची विस्तृत उत्तरे दिली. काही लिगल प्रश्नांची उत्तरे ऍड. घोष यांनी दिली. सॉफ्टवेयरची किंमत आणि कोटेशनवर बरीच चर्चा झाली. कोणती सेवा कशाप्रकारे आणि किती कालावधिपर्यंत दिली जाईल यावर पण चर्चा झाली आणि मिटिंग समाप्त झाली.
ते तिघंही वेदिका ऑटोच्या बोर्ड मेंबर्सबरोबर आपापल्या विषयावर बोलत होते.

"मिस्टर विराट, काय अप्रतिम प्रेझेन्टेशन दिलं तु, माझ्या सगळ्या शंकांचं तु समाधान केलस." वेदिका मॅडम अगदी उत्साहात म्हणाल्या.

"थँक यु सो मच मॅम" विराटने छानसे हास्य करीत उत्तर दिले.

"ओह्ह पिज विराट, मॅम म्हणू नकोस, फक्त वेदिका म्हण. मी काही एवढी पण वयस्कर नाही." वेदिकाने उत्तर दिले आणि दोघेही हसायला लागले.

"ठीक आहे मिसेस वेदिका, तसंही तुम्ही पंचवीशीतल्या वाटता." विराटने मस्करी करीत उत्तर दिले.

"चुकलास तू विराट, मी तर आता फक्त बावीसची आहे" पुन्हा दोघेही हसायला लागले.

"फक्त तेवढी माहिती मला पाठव, हे घे माझे कार्ड, माझा पर्सनल नंबर आहे, फक्त तुझ्यासाठीच" मिसेस वेदीकाने विराटच्या नजरेला नजर भिडवत कार्ड दिले. विराटने कार्ड स्वीकारले आणि त्या तिघांनी तेथून निरोप घेतला.

पाच कंपन्यामधून आता फक्त दोन कंपन्या निवडल्या होत्या वेदिका ऑटोच्या बोर्ड मेंबर्सनी. त्यात एक होती OSR टेक्नॉलॉजी आणि दुसरी होती बलाढ्य अशी जर्मनीची सॉफ्टवेयर कंपनी. त्यावर त्यांच्या मेंबर्समध्ये बरीच चर्चा झाली. शेवटी फायनल निर्णय मिसेस वेदिकाच्या हातात होता. कंपनीचे सर्व निर्णय त्याच घेत.

मिसेस वेदिका आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसल्या. जर्मनीच्या कंपनीने OSR टेक्नोलॉजीपेक्षा कमी किमतीचे कोटेशन दिले होते त्यामुळे जर्मनीच्याच कंपनीची निवड होईल अशी बोर्ड मेंबर्सना आशा होती. पण वेदिकाचं मन मात्र OSR च्या बाजूने झुकलं होतं कारण त्यात विराट होता.

वेदिका पन्नाशीच्या आसपासची बिझनेस वूमन होती. पाहायला सुंदर, सुडोल अन कसलेलं शरीर, अत्यंत उच्चब्रू राहणीमान, मोठमोठ्या लोकांसोबत उठबस, जे आवडलं ते कोणत्याही किमतीला मिळविणारी, किटी पार्ट्या, ड्रिंक्स, नाईट आउट, पब्सला जाऊन मजा करणारी इ. तिची आलिशान जीवनशैली होती. कंपनी वाढायला लागल्यावर मिस्टर शर्मा मिटिंग्स आणि कॉन्फरन्समध्ये बिझी असायचे. मग वेदिकानेही स्वतःला इतर गोष्टीत बिझी ठेवत असे. त्याच दरम्यान तिचे इतर पुरुषांशी संबंध यायला लागले. नंतरच्या काळात विनोद आणि वेदीकात तसलं काही घडत नसे. विनोदही आपली भूक बाहेर भागवून घेत असे.

बऱ्याच दिवसानंतर वेदिकाला कुणी यंग आणि डॅशिंग पुरुष भेटला होता. विराटला पाहताच क्षणी ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. त्याची पर्सनॅलिटी, त्याचं बोलणं, त्याची नजर, सारं काही वेदिकाला वेड लावेल असंच होतं. तिची मानसिक भूक तर केव्हाच मिटली होती. आता फक्त शारीरिक भूक उरली होती. आता पर्यंत वेदिकाला जे पण पुरुष आवडले त्या सर्वांबरोबर तिने तो अनुभव घेतला होता. तिच्यासारख्या सुंदर मदिराक्षीच्या जाळ्यात कुणी नाही अडकेल असं होतंच नव्हतं. ती त्यांच्याकडून हवं तेव्हा आणि हवं तशी आपली भूक भागवत असे. आता तिचा टार्गेट विराट होता. त्याला मिळविण्यासाठी ती काहीही करायला तयार होती आणि तिने आपले फासे टाकायला सुरुवात केली.

साधारण रात्रीचे नऊ वाजले असतील, तिला इच्छा झाली विराटशी बोलायची. तिने त्याला काही माहिती विचारायच्या बहाण्याने लगेच कॉल केला, पहिली रिंग गेली परंतु विराटने कॉल उचलला नाही म्हणून तिने परत फोन लावला...

क्रमशः

पाचवा भाग- येथे वाचा.

No comments:

Post a Comment