22 July, 2016

जाऊदे रे...

'जाऊ दे रे...' हा आजकाल परवलीचा शब्द झाला आहे. काही झालं कि 'जाऊ दे' म्हणून सोडून द्यायची कला एव्हाना आपण चांगलीच अवगत केली आहे. एखाद्या सिग्नलवर मामूनी (ट्राफिकवाल्या) पकडलं कि जाऊ द्याना हो म्हणत हिरवी पत्ती सरकविली कि काम होऊन जाते. एखाद्या बलात्काराची घटना घडते तेव्हा, त्या नराधमांना जनतेच्या हवाली करण्याची मागणी करणारा एखादा, देशात न्याय व्यवस्था शाबूत असून त्या आरोपींना फाशीच होईल असे म्हणणारा दुसरा तर 'जाऊदे ना यार' आपण काय इथे नुसते तोंडचे फटाके फोडल्याने काम होणार आहे का असं म्हणणारा तिसरा व्यक्ती सापडतोच.


'सब चलता है ' नंतरचं भारतीयांच्या तोंडी असलेलं हे दुसर महत्वाच वाक्य. खरतर 'जाऊदे रे' म्हणनं काही वाईट नाही पण काय जाऊ द्यायचं आणी काय नाही ह्याच्यावर काय ते ह्या शब्दांच महत्व ठरत असतं. नकारात्मक गोष्टी धरून ठेवण्यात कुठलाच शहाणपणा नसतो. त्या सोडून देण्यातच फायदा असतो. त्यासाठी 'जाऊदे रे' हा शब्द वापरणे जास्त श्रेयस्कर ठरेल. म्हणजे बघाना, तुम्ही जीवनात एखादे ध्येय ठरवले आहे आणी ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही अपार कष्टसुद्धा घेत आहात. पण दिवसामागून दिवस जात आहे आणी त्यात यश काही मिळत नाही आहे. आता तुमचा पेशन्स संपू लागला आहे अश्या वेळेस पुष्कळजण आपल्या धेयालाच 'जाऊदे रे' म्हणून टाटा, बाय- बाय करतात. म्हणजे त्यासाठी घाव्या लागणाऱ्या मेहनतीला किवा कष्टालाच 'जाऊदे रे' म्हणतात. मग इथे सकारात्मक पद्धतीने 'जाऊदे रे' कसं वापरता येईल...?

खरतर अंतिम ध्येयापेक्षा त्या ध्येयाकडे घेऊन जाणारा प्रवास खूप महत्वाचा असतो हेच आपण विसरतो. आपलं सर्व लक्ष त्या ध्येय गाठण्यावर असते. यात काही वावगे नाही. ते असायलाच पाहिजे परंतु प्रवासाची मजा घेत-घेत पुढे जाणारच अंतिम ध्येय गाठत पर्यंत टिकून राहू शकतो. आपला पेशन्स टिकवू शकतो. आणी या प्रवासात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ध्येयाला 'जाऊदे रे' न म्हणता त्यात येणाऱ्या अडथळ्याला, नकारात्मक विचारला, 'जाऊदे रे' म्हणणे फायद्याचे असते. 'जाऊदे रे' हि वृत्ती नकारात्मक गोष्टीप्रती ठेवली तर जास्त फायदा होतो.

जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्या आपण आपल्या कर्माने किवा हुशारीने सोडवू शकत नाही. काही समस्यांना वेळ जाऊ द्यावा लागतो व त्या निसर्गावर सोडाव्या लागतात. त्या आपोआपच सुटतात. तसंच दुखःच असत. योग्य वेळ आली कि मनुष्य त्यातून बाहेर पडतो. परंतू दरम्यानच्या काळात त्याच्यावर जो मानसिक आघात होतो तो झेलण्यासाठी नकारात्मक गोष्टींना 'जाऊदे' म्हणून दुर्लक्ष केल्यास योग्य फायदा होतो. काही समस्यांचा आपण उगाचच बाऊ करीत बसतो. त्या समस्येला धरून बसण्यापेक्षा त्या दुर्लक्ष केल्याने त्या लवकर सुटतात. किंबहुना त्या दुर्लक्षच करण्याच्या लायकीच्या असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याकरिता 'जाऊदे रे' हे हत्यार योग्य वेळी वापरले तर त्याचे पुष्कळ फायदे होऊ शकतात.

No comments:

Post a Comment