16 August, 2014

देशात जातीवाद कमी होत आहे.? कि वाढत आहे.?

(येते 'जात' हा शब्दप्रयोग जात तसेच धर्म या दोन्ही अर्थाने वापरलेला आहे.)

काल 15 ऑगस्ट असल्याने सर्व भारतीयांचे देशप्रेम नेहमी प्रमाणे उतू जात होते. भारतीय असल्याचा गर्व आणी आपण कसे सो कॉल्ड 'भारतीय' आहोत हे रंगविण्यात न्यूज च्यानेलवाल्यांनी आणी भारतीय लोकांनी अतोनात परिश्रम घेतले. तसे ते प्रत्येक स्वातंत्र आणी गणतंत्रदिनी घेतात.

आपला तिरंगा, आपले राष्ट्रगान, आपले स्वातंत्रयुद्ध, आपले शहीद जवान या सगळ्या गोष्टीने आपली छाती 15 ऑगस्ट आणी 26 जानेवारीला अभिमानाने फुलून जाते. पण या सर्व गोष्टीचा अभिमान फक्त दोनच दिवस??? हे दोनच दिवस आपण भारतीय म्हणून जगतो (यात मी पण आलो ). उरलेल्या 363 आणी लीप वर्षातील 364 दिवस आपण एक विशिष्ठ जातीचे वा धर्माचे म्हणून जगत असतो. प्रत्येक टप्यावर मी अमुक अमुक जातीचा, अमुक अमुक धर्माचा, सरकारने कसं आम्हाला आरक्षण दिलं, आम्हाला कशी पूर्ण फी भरावी लागते, आमच्या जातीत कशी खूप स्पर्धा आहे ई. गोष्टीने आपण जातीवादाच समर्थन करीत असतो आणी प्रत्येक टप्यावर जातीवाद जिवंत ठेवत असतो.

जात ही एक अशी गोष्ट आहे कि जी जन्मतः माणसाला चिकटून येये आणी ती त्याला/तिला जन्मभर चिकटलेली असते असे म्हणतात पण माझ्या मते जात माणसाला नाही तर माणूस जातीला चिकटलेला आहे. वर्ष उलटून गेले तरी त्याच्याच्याने जातीला दूर सारणे काही जमले नाही. हा संवेदनशील विषय असल्याने आपल्या जातीची बाजू घेतली तर चांगल आणी विरोधी बाजू घेतली तर राग येतो लोकांना. वर्षनुवर्षे उलटून गेली, प्रगती झाली, नवनवीन शोध लागले, माहिती तंत्रज्ञानाचे युग आले, इंटरनेट आले, मनुष्य चंद्रावर पोहोचला आता मंगळाच्या मोहिमेवर आहे परंतु जात-पात आणी उच्चनीचता आपण म्हणजे खासकरून भारतीय लोक अजूनतरी काही विसरू शकलेलो  नाही. आपणा कितीही जातीभेद न पाळण्याच्या गोष्टी केल्या तरी आपल्या मेंदूत जे जातीआधारित कप्पे झाले आहे त्यानुसार आपण मनुष्यांच  वगीकरण करतच असतो. 

आज प्रत्येक्षात लोक जातीवाद जरी पळत नसले (काही भागातील अपवाद वगळता) तरी आपल्या वागण्यात, बोलण्यात आणी कृतीत त्याच समर्थन असते. आदिवासी आणी मागास भागातील काही जाती सोडल्या तर देशात अशी कोणतीच जात वा धर्म नाही आहे कि त्या जातील सर्व लोक मागास वा सर्व लोक प्रगत आहे. मग संपूर्ण जातीलाच अथवा धर्माला आरक्षण देण्यात काय अर्थ आहे? आज कित्येत IAS, IPS, क्लास वन, म्यानेजर आणी उत्तम व्यावसायी असणार्यांचे मुलं/मुली आरक्षण घेत आहे. का खरच अश्या बापाच्या पोरांना आरक्षणाची गरज आहे? आणी त्याच जातीच्या गरीब बापाच्या  पोराचे काय? एकाच जातीच्या अमीर बापाच्या पोरामुळे त्याच जातीच्या गरीब बापाच्या पोराची जागा वा नौकरी जात असेल तर काय फायदा आहे अश्या आरक्षण पद्धतीचा? आणी आरक्षणामुळे मानसिक भेदभाव वाढायला फायदाच मिळतो. तो अमुक अमुक जातीचा म्हणून लवकर नोकरीला लागला, कमी मार्क्स पडले असताना देखील त्याला वरची पोस्ट मिळाली, त्याच्या जातीमुळे त्याचे संपूर्ण शिक्षण फुकट झाले अशी द्वेषाची भावना युवा वर्गात जातीआधारित आरक्षणाने तयार होत आहे. कोवळ्या वयातच जातीआधारित गट पडायला आणी मित्र बनवतांना आपल्या जातीतीलच हवा अशी विचार पद्धती रुजायला सुरवात झाली आहे.

जातीभेदामुळे होणारे अत्याचार, उच्च निचतेमुळे प्रेमविवाहाला नकार त्यातून खून इत्यादी घटना मन अस्वस्थ करणाऱ्या आणी देशाला पुरोगामी नाहीतर प्रतिगामी बनविणाऱ्या आहे. देवावर असणाऱ्या श्रद्धेला पण आपण जातीत विभागतो. म्हणजे गणेशोत्सव हिंदूंचा, आंबेडकर जयंती दलितांची, ईद, मोहरम मुस्लिमांचे ई. बर हे इतकच नाही तर आजकाल तर आपापल्या सणात शक्ती प्रदर्शन करण्याची पद्धत धृढ झाली आहे. हा सगळ्या गोष्टीने आपली आपल्या मनातील जाती पातीतील दरी वाढत चालली आहे.

मागे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होत कि जातीभेद मिटवायचा असेल तर 'जात' लिहीन बंद करायला पाहिजे परंतु काही लोकांनी थयथयाट केला कि जात लिहीन बंद केलं तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल? आरक्षण सुरु करण्याचा मुख्य उद्देशच वंचितांना प्रवाहात आणणे हा होता. व आता जे प्रवाहात आले आहे म्हणजेच प्रगत झाले आहे त्यांना याचा परत लाभ न मिळता जे आजही पप्रगतीपासून वंचित आहे त्यांना मिळायला हवा. त्यासाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा (Creamy Layer) आखणे सर्वांसाठी हिताचे ठरेल. म्हणजे खऱ्या गरजुपर्यंत याचा लाभ पोहोचेल. त्याच प्रमाणे जातीभेद मिटविण्यासाठी आंतरजातीय विवाह ते पण दोन्ही कुटुंबाच्या संमतीने होऊ लागले तर याचा समाजाला नक्कीच फायदा होईल.

चीन, रशिया सारखे देश जगात आपले वर्चस्व  आणी ताकत वाढवीत असताना आपण जाती-धर्मासारख्या गोष्टीवरून आपल्याच देशाला दुबळे करीत आहो. राजकीय पातळीवर होणारे राजकारण ह्यास जेवढे जबाबदार आहे तेवढेच आपले आपल्या जाती-धर्माप्रती असणारी कट्टरता ह्यास जबाबदार आहे. आपल्या मनातील कटुता आणी कट्टरता कमी करून आपण इतर जाती-धर्मात मिसळलो, त्यांना आपल्या सणात सहभागी केलं आणी प्रत्येकांनी इतर जाती-धर्माचा तिरस्कार न करता सर्व धर्म समभाव असा विचार ठेवला तरच भारत महासत्तेच्या दिशेने पुढे सरकेल अन्यथा भारताने आकाशात कितीही उपग्रह सोडले तरी जमिनीवर आपण मागासच राहू.

(ह्या लेखामागचा उद्देश कुणाला आरक्षण द्यावे, कुणाला देऊ नये ह्या विषयावर टिपणी करने नसून वंचितांना प्रवाहत आणून तसेच आपल्या मनातील जातीवादाची कट्टरता क्षीण करून त्याद्वारे जातीभेद कमी ह्यायला मदत होत असेल तर अवश्य व्हावा हा आहे. ) 

No comments:

Post a Comment