05 October, 2014

विरह

वेळ सायंकाळची होती. सूर्य क्षितिजापल्याड झेपाविण्याच्या तयारीत होता. पक्षांचा थवा परतीच्या वाटेवर निघाला होता. निरव शांततेच्या ह्या वातावरणात सूर्य क्षितिजावरून लाल, पिवळ्या, भगव्या रंगाची मुक्त उधळण करीत होता. गार वाऱ्याची झुळूक हळुवार इकडून तिकडे बागडत होती. परंतु पायल- राघवच्या प्रेमाने वातावरण उबदार झाले होते.

पायलच्या नाजुक सिंहकटी कंबरेवर अलगद दोन्ही हात ठेवत राघवने तिला आपल्या जवळ ओढले. हळुवार मागून तिला मिठी मारून आपले दोन्ही हात तिच्या पोटाभोवती गुंडाळून तिला आपल्या उबदार मिठीत घेतले. आपली हनवटी तिच्या खांद्यावर ठेवली. आता तो तिच्या केसांचा सुगंध अलगद टिपू शकत होता व ती त्याचा श्वासोच्छवास सहज जाणवू शकत होती.

तिच्या शांत असण्यात गोंधळाचा विरोधाभास होता. डोक्यात विचारांचा डोंब मजला होता परंतु त्यांना ओठावर येण्यास जणू मनाई होती. तिची नजर थेट क्षितिजाला भिडली होती आणी ते क्षितीज तिला तिच्या प्रेमाची आठवण करून देत होते. त्याने केलेल्या रंगाची उधळण जणू तिला जळवीन्यासाठीच होती. एव्हाना तो सोबत असताना सतत बडबडणारी ती आज शांत राहूनच व्यक्त होत होती.

पायल व राघव 3 वर्षापासून सोबत होते. एकमेकांवर जीवापाड प्रेम. लग्न करून आपल्या साथीदाराला जन्मभर साथ द्यायची हे त्यांनी एकमेकांना दिलेले वचन. पण ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही आणी जे होते ते कधी ठरवलेलंच असते असही नाही. यालाच कदाचित आयुष्य म्हणतात. स्थळ आलं होत तिच्यासाठी. लग्न करून पायल लंडनला जाणार होती व ठरल्याप्रमाणे हि त्यांची शेवटची भेट होती. जन्मभर साथ देण्यासाठी केलेला वादा आता तुटणार होता. 3 वर्षापूर्वी धरलेला हात आता सुटणार होता. सोबत पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणात चुरडा होणार होता. ह्या क्षणाचे साक्षीदार म्हणून अश्रूंची वाट मोकळी झाली होती. त्याच्या मिठीची पकड आता अधिकच घट्ट झाली होती.

विरहाचा क्षण जवळ- जवळ येत होता. निरोपाची दवंडी पेटली होती. एकाच वाटेवरचे दोन वाटसरू आता वेगळे होणार होते. हृदयाच्या एका कोपऱ्यात आठवणींचा साज चढणार होता. विरहाच्या ठिणगीने आता पेट घेतला होता. फक्त भावनांनी व्यक्त होण सुरु होत. विरहाच्या गर्तेत दोघेही बुडाले होते.  निशब्द शांततेत घड्याळीचे काटे नुसतेच पुढे सरकत होते.

आता अंधारही पडायला सुरवात झाली होती. त्याची मिठी देखील सैल झाली होती. ती पलटली. त्याच्या डोळ्यात तिने डोळे टाकुन बघितले. तेसुधा अश्रुनी डबडबले होते. तिने त्याचा हात हातात घेतला, म्हणाली “आता पर्यंत तू मला खुप प्रेम दिलंस, आता असच प्रेम स्वतःवर कर, स्वतःच्या पुढील आयुष्यावर कर. मेहनत कर. खुप मोठा हो. तुझी कीर्ती लंडनपर्यंत आली तर आनंदच होईल, तू  मात्र तिथे कधी येऊ नकोस. घरच्यांची आणी स्वतःची काळजी घे. बाय, लव्ह यु.”

हे ऐकून राघव सुन्न झाला होता. गालावरून अश्रुच्या धारा ओठापर्यंत आल्या होत्या. तो फक्त पाहतच होता. तिने आपली स्कुटी सुरु केली. जड अंतकरणाने ती रडतंच निघुन गेली. तिच्या स्कुटीचा लाईट आता लुप्त होता- होता दिसेनासा झाला. तो मात्र भरल्या डोळ्यांनी आताही पाहतच होता.....

No comments:

Post a Comment