14 September, 2019

अनकंट्रोल्ड- भाग 3



दुसरा भाग- येथे वाचा.


घराकडे जात असताना त्याला त्या शायरीच्या ओळी सतत आठवत होत्या. सायंकाळच्या भारी ट्राफिक मधून आपण केव्हा घरी पोहोचलो हे त्याला कळाले सुद्धा नाही. नेहमीप्रमाणे स्वरा आपल्या शाळेतल्या गमती जमती विराटला सांगत होती. पण त्याचे सारे लक्ष ओजस्वीशी झालेल्या बोलण्यातच होते. संपदाशी पण तो काही जास्त बोलत नव्हाता.

"अरे काही झालं का ऑफिस मध्ये आज?" संपादने काळजीने विचारलं.

"नाही गं, काहीच तर नाही" अन्नाचा घास घेत विराटने उत्तर दिले.

"मग तू आज असा इतका गप्प का"

"कुठे गप्प आहो, बोलतोय तरी" संपदाकडे लक्ष न देताच विराटने उत्तर दिले.

"मी विचारतेय तेवढंच उत्तर देतोय तू, काही टेन्शन आहे का ऑफिस मध्ये? फार विचारात दिसतोय."

"नाही गं, त्या प्रोजेक्ट बद्दल विचार करत होतो थोडं" विराटने उत्तर दिलं.

"तू म्हणाला होतास ना कि ऑफिसच टेन्शन घरी नाही आणणार म्हणून?" संपदा थोड्या रागात बोलली.

"बरं चुकलं बाबा, जाऊदे सोड, स्वरा अभ्यास करते कि नाही रोज?" गोष्ट टाळण्याकरिता विराटने विषय बदलावीला.

जेवण झाल्यावर त्याने लॅपटॉप उघडला आणि वेदिका ऑटोबद्दल इंटरनेटवर सर्च करून माहिती घेऊ लागला. पण थोड्याच क्षणात त्याला आज तो ओजस्वीबद्दल जे काही बोलला ते आठवायला लागलं. तिची साहित्याबद्दलची आवड, जाण, इच्छा ई. त्याने लगेच 'निदा फाजली' सर्च केलं. त्यांच्याबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल संपूर्ण माहिती वाचून काढली, त्यांच्या काही शायऱ्या वाचल्या. त्याला त्या जास्त कळाल्या नाही पण उत्सुकतेपोटी त्याने वाचून काढल्या. त्याने नंतर इतरही कवी, शायर, लेखक, त्यांच्या कादंबऱ्या यांच्याबद्दल बरीच माहिती वाचली. रात्री उशिरा पर्यंत तो हि सारी माहिती वाचत होता. आता त्याला थोडाफार का असेना साहित्याबद्दल माहित झालं होतं.
इकडे ओजस्वीच्या मनावर देखील थोड्याफार प्रमाणात का असेना विराटने प्रभाव पाडला होता. कंपनीबद्दल, कंपनीच्या कार्यशैलीबद्दल, तिथल्या लोकांबद्दल तिला बरंच काही जाणून घायचं होतं. हे सगळं आत्ता विराटला विचारावं असं तिला वाटू लागलं. त्याला आता कॉल करण्याची आणि त्याच्याशी बोलण्याची तिची इच्छा झाली पण तिने स्वतःला आवरलं. लगेच तिला तिने आज विराटला सांगितलेली शायरी आठविली. तिला आठवलं कि कुठल्याश्या डायरीत तिने काही रचना केल्या होत्या त्या लिहिल्या आहे. ती लगेच डायरी शोधू लागली. डायरी काही मिळेना. तिची डायरी तिकडे अमेरिकेतच राहिली होती. येताना काही सामान तिकडेच आपल्या मामांकडे ठेवलं होतं त्यात ती डायरी राहिली होती. ती डायरी आता विराटला नाही देखविता येणार म्हणून ती नाराज झाली. पण तिने लगेच मामांना फोन केला आणि त्या डायरीतल्या काही पानांचे फोटोज पाठवायला सांगितले. लगेचच मामांनी फोटोज पाठविले. आपण लिहिलेल्या शायऱ्या, चारोळ्या, कविता बघून तिला आनंद झाला. ती त्यात हरवून गेली. ती एक एक शायरी/चारोळी वाचू लागली आणि ती लिहिण्यामागचा प्रसंग तिला आठवू लागला.

"त्याच्या घराची पाऊलवाट लागली की
मी जरा थांबून जाते,
उगाच जुन्या आठवणी कश्याला
म्हणून जरा लांबून जाते."
......

तिघेही प्रोजेक्टच्या तयारीला लागतात. ठरल्याप्रमाणे रोज त्यांची लंच नंतर एकदा मिटिंग होते. आपापले प्रश्न, मुद्दे त्यावर तिघेही चर्चा करतात. ओजस्वी बऱ्याच टेक्निकल गोष्टी आपल्या टेक्निकल टिम कडून समजून घेते. मागील काही वर्षांपासून होणारा लॉस, घसरत जाणारे शेयर भाव इत्यादी गोष्टीवर कसं उत्तरे द्यायची यावर ते स्ट्रॅटेजी बनवितात. कायद्यासंबंधी बऱ्याच गोष्टी ऍड. घोष त्या दोघांना समजावीतात.

रोजच्या भेटीतून ओजस्वी आणि विराटमधील मैत्रीदेखील फुलत जाते. कामाव्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी ते एकमेकांशी शेयर करू लागतात. विराट ओजस्वीच्या चारोळ्यांवर जाम फिदा होतो. त्यालाही साहित्यात आवाड निर्माण होते. थोडा निवांत वेळ मिळाला की त्यात एखादे साहित्य वाचून घेतो.

ओजस्वीला विराटच्या अकाउंट संबंधी ज्ञानाचं फार कुतूहल वाटतं. बॅलन्सशिट मधील बारकावे, टॅक्स मधील अमेडमेंट्स इ. बऱ्याच गोष्टी ती त्याच्याकडून समजून घेते. पैश्याचं व्यवस्थापन मग ते कंपनीच्या असो की स्वतःच्या पैश्याचं असो ते कसं करायचं हे ती त्याच्याकडून शिकते. म्युच्युअल फंड, फायनान्शियल प्लॅनिंग इ. संबंधी ज्ञानाची नवी कवाड तिच्यासाठी खुली होतात.

याच दरम्यान विराटला ओजस्वी आवडू लागते. ती सोबत असली की तो त्याचं सार टेन्शन विसरून जातो. तिचंही त्याच्या प्रत्येक गोष्टीला दाद देण, कवितेतील बारकावे समजून घेणं इ गोष्टी त्यांना एकमेकांत अजून गुंतवत जातात. तिलाही त्याची साथ हवीहवीशी वाटू लागते. तो नसला जवळ कि बेचैनी होते.
अश्यातच त्यांचं रात्री पुष्कळवेळ फोनवर बोलणं होत असे. एक दोनदा संपदाने विराटला विचारलंही पण ऑफिसच काम आहे म्हणून बोलतो असं तो तिला सांगत असे.

"माझ्या आता लक्षात आलं ह्या कंपनीच नाव OSR टेक्नॉलॉजी का आहे ते" विराट उत्तरला.

"का.?" ओजस्वीने प्रश्न केला.

"OSR म्हणजे 'ओजस्वी सुब्रमण्यम रेड्डी', हो ना?" विराट अगदी उस्फुर्तपणे म्हणाला.

"हो, माझ्या नावावरूनच ह्या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं आहे" ओजस्वीने हलकेसे हास्य करीत उत्तर दिले आणि पुढे शून्यात नजर लावून म्हटले, "बाबांचं स्वप्न आहे की OSR टेक्नोलिजी देशातली सर्वोत्तम आयटी कंपनी बनावी."

"हो, आणि आम्हासर्वांचसुद्धा. आपण सध्या थोड्या कठीण परिस्थितीतून जात आहो पण मला विश्वास आहे की लवकरच आपली कंपनी प्रॉफिट मध्ये येईल. आपण देशात सर्वोत्तम बनू. आता फक्त वेदिका ऑटोची डिल क्रॅक झाली म्हणजे बघ कंपनी कशी पूर्वपदावर येते ते." विराट उत्साहाच्या भरात बोलत होता.

"मला तर जाम टेन्शन येत आहे रे विराट, हा प्रोजेक्ट आपल्याला मिळेल कि...."

"आपल्यालाच मिळेल", ओजस्वीला मध्येच थांबवत विराट म्हणाला.

"तुला कसं माहीत.?"

"बघ ओजस्वी, आत्मविश्वास सर्वात महत्वाचा आहे. जीवनात पण आणि या डिल मध्ये पण", विराट तिला समजावत पुढे म्हणाला, "आपली कंपनी आज कोणत्या स्थितीत आहे हे  कंपनीच्या 'बॅलन्सशीट वरून' कळते पण येणाऱ्या काळात आपली कंपनी कुठे असेल हे आपल्या आत्मविश्वासावरून कळते."

"वाह विराट, तुझी हिच तर गोष्ट मला खूप आवडते. तू एकदा बोलायला सुरुवात केली की मग तुला ऐकतच राहावंसं वाटतं. तुझा प्रत्येक विचार मला प्रेरणा देतो, स्पुर्ती देतो. कंपनी जॉईन करायच्या आधी मी नाराज होती, मला काही इंट्रेस्ट वाटत नव्हता, पण आता मला ह्या सर्व गोष्टीत आवड निर्माण झाली आहे. कंपनीच्या खूपशा गोष्टी कळायला लागल्या आहे, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण झाली आहे आणि हे केवळ तुझ्यामुळे झालं आहे विराट" ओजस्वी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोलत होती.

"आणि तुझ्यामुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक विस्तृत झाला", विराटने लगेच उत्तर दिले.

"माझ्यामुळे.?" ओजस्वीने कपाळावर आठ्या आणत विचारलं.

"हो, मी आधी अकौंटिंग, फायनास ई. सोडलं तर इतर कुठल्याच गोष्टीत रस घेत नव्हतो, पण आता मला साहित्यात, कवितेत रस निर्माण झालाय, आता मला कविता कळायला लागल्या आहे, त्यांचे अर्थ समजायला लागले आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मी आता भरपूर विचार करायला लागलो आहो करियर व्यतिरिक्त इतर गोष्टींचा." विराट भारावल्यागत बोलत होता.

"मग तू केली का एखादी कविता, चारोळी" ओजस्वीने सहज विचारलं.

"हो, चारोळीचा प्रयत्न केला मी"

"काय.!" ओजस्वीने आश्चर्याने विचारले आणि पुढे म्हणाली, " अरे मग सांग, वाट कसली बघतोय."

"अरे नाही, राहूदे, नको विचारू प्लिज"

"नाही, तुला संगावीच लागेल", ओजस्वी अगदी उत्साहात म्हणाली. ती काही ऐकणार नाही हे त्याचा माहित होतं.

"बघ हा, मी फक्त प्रयत्न केला, कशी झाली ते तूच सांग...

"मी सहज लिहावी कविता
प्रेमाची उपमा तू द्यावी.
शब्दाला प्राप्त व्हावा अर्थ
जेव्हा चाल तू गुंफावी."

"वाह वाह !" ओजस्वीने मनापासून दाद दिली आणि म्हणाली, "खरंच खूप मस्त आहे, पहिलीच चारोळी एवढी छान, पुढे तर अजून छान लिहू शकशील तू."

"बस तुझा आशीर्वाद असू दे.." विराटने मस्करी केली आणि दोघेही खळखळून हसले.
......

"आजकाल लेट होत आहे तुला घरी यायला, फोनवर पण बराच वेळ बोलत असतो, काम खूप वाढलं आहे का ऑफिसमध्ये.?" संपदाने प्रश्न केला.

"अग तुला मी सांगितलं होतं ना त्या वेदिका ऑटो बद्दल, त्यांचा प्रोजेक्ट मिळविण्यासाठी जोरदार तयारी सूरू आहे.  उद्यापण जावं लागेल मला ऑफिसला, कारण सोमावरी प्रेझेन्टेशन आहे" विराटने माहित दिली.

"पण तुला वाटत नाही आहे की या सगळ्यामध्ये घराकडे दुर्लक्ष होतं आहे ते?" संपदाने प्रश्न केला.

"हो, पण काही दिवसांचीच गोष्ट आहे, एकदा का प्रोजेक्ट मिळाला, नवीन काम सुरु झालं की सर्व पूर्वव्रत होईल", संपदाला दिलासा देत विराटने उत्तर दिले.

खरंतर फक्त ऑफिसच काम नाही तर विराट आणि ओजस्वीच फुलत जाणार प्रेम हे देखील एक कारण होतं घराकडे दुर्लक्ष्य होण्याचं पण नवीन प्रोजेक्टच्या नावाखाली विराटने सावरून घेतले.
......
(रविवारी सकाळी ऑफिसमध्ये, रिव्हिव मिटिंगमध्ये)

"आपल्या कंपनीच्या शेयर प्राईजमध्ये होणाऱ्या घसरणीत अमेरिकन शेयर मार्केट आणि तेथील वित्तीयस्थितीचा देखील प्रभाव आहे म्हणून आपल्या शेयरच्या घसरणीचा मुद्दा आपण हा दाखला देत सावरू शकतो." विराट मिटिंगमध्ये मॅनेजमेंटपुढे मुद्दा मांडत म्हणतो.

"कायदेविषयक बाबींवर देखील आपली कोंडी होऊ शकते, त्याच काय विचार केला आहे.?" रेड्डींनी प्रश्न केला.

"नवीन बजेटमध्ये कॉर्पोरेट टॅक्समध्ये करण्यात आलेले बदल आणि अश्याच काही केस मध्ये उच्च न्यायालयाने दिलेले जजमेंट्स इ. गोष्टींच्या आधारे आपण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे निवारण करु शकतो", ऍड. घोष आत्मविश्वासाने सांगत होते.

"चला तर मग, तुमची तयारी झाली आहे असं समजायला हरकत नाही, उद्याच्या मिटिंगसाठी सर्वांना शुभेच्छा. आशा करतो प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल.", रेड्डीनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती. रिव्हिव मिटिंग आटपून ओजस्वी आणि विराट कॉफी प्यायला एका रेस्तराँमध्ये गेले. विराटला ओजस्वी आवडायला लागली होती. ओजस्वीला पण विराटबद्दल फिलींग्स यायला लागल्या होत्या. दोघांनापण एकमेकांचा सहवास आवडत असे. त्यांचे विचार एकमेकांशी जुळत. एकमेकांशी न बोलता राहणं आता त्यांना कठीण व्हायला लागलं होतं.

त्यांच्या गप्पा आता रंगात आल्या होत्या. आपल्या मनातल्या भावना ओजस्वीला सांगून टाकाव्या असं एक क्षण विराटला वाटून गेलं पण लगेच त्याच्या समोर 'स्वरा'चा चेहरा आला, 'संपदा'चा चेहरा आला. आपण आता सिंगल नाही, आपली फॅमिली आहे, घरी कुणीतरी आपली वाट बघत आहे असे विचार त्याच्या मनात तरळून गेले आणि त्याने आपल्या भावना व्यक्त करायचं टाळलं. काही वेळाने त्यांनी निरोप घेतला.
.......
रात्री जेवण झाल्यावर विराट आपल्या लॅपटॉपवरील प्रेझेन्टेशनवर एक नजर फिरवू लागला. शेवटचे काही बदल त्याने केले. परत एकदा प्रेसेंटशनवरून नजर फिरविली. सर्व व्यवस्थित आहे ना ते चेक केलं. लॅपटॉप बंद केला आणि झोपी गेला. आत उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा होती.

क्रमशः

चवथा भाग- येथे वाचा.

No comments:

Post a Comment