25 August, 2019

अनकंट्रोल्ड- भाग 1



(कथा, कथेतील पात्र आणि प्रसंग काल्पनिक आहे.)

विराट ऑफिसच्या गेट मधून आता शिरणार तोच गेट जवळ एक ऑडी येऊन थांबली. वॉचमनने धावत जाऊन दार उघडले. नकळत विराटची नजर तिकडे गेली. गाडीतून एक सुंदर तरुणी बाहेर आली. साडेपाच फूट उंच, सुडोल बांधा, मोकळे सोडलेले सिल्की केस, गुडघ्यापर्यंत असलेला टाईट स्कर्ट, वर लायनिंगचा शर्ट, डोळ्यावर गॉगल आणि कानाला मोबाईल. ती गाडीतून बोलताच उतरली आणि बोलतच आत गेली. विराट तिचं सौंदर्य बघून स्तब्ध नव्हेतर घायाळच झाला होता. 'कोण असेल ती सौंदरवती? नक्कीच चांगल्या पोस्ट वर असणार, HR मॅनेजर तर नसेल? एवढ्या कमी वयात?' असल्या विचारातच विराट आत गेला. आपल्या केबिनमध्ये जाऊन बसला.

विराट पुण्यातल्या एका मोठ्या आयटी कंपनीत फायनान्स मॅनेजर होता. सहा फुट उंच, वेल मेंटेन बॉडी, देखणा, हसरा आणि जिथे जाईल तिथे सगळ्यांना आपलंसं करणारा पस्तिशीतला तरुण होता. सुंदर मनमिळाऊ बायको आणि सहा वर्षाची एक गोड मुलगी, असा छोटा पण आनंदी परिवार होता त्याच्या. वडील तहसील कार्यालयात लिपिक होते आणि आता रिटायर झाल्यामुळे गावाकडेच राहत.

विराट पूर्वीपासूनच हुशार आणि महत्वाकांक्षी होता. अभ्यासातच नाही तर खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमात देखील तो नेहमी पुढे असायचा. वादविवाद स्पर्धेत तर त्याचा हात कुणीच पकडत नसे. युनिव्हर्सिटी स्तरावर तर भरपूर पुरस्कार त्याने वादविवाद स्पर्धेत मिळविले होते. कॉलेजच्या दिवसात तो शिक्षकांचा सर्वात आवडता विद्यार्थी होता. मित्रांमैत्रिणींमध्येही त्याचीच डिमांड असायची. अभ्यासापासूनच तर प्रेमाच्या लफडीपर्यंत सार्याच समस्या तो सोडवायचा.
'चार्टर्ड अकाउंटंट' बनणं हे त्याचं स्वप्न होतं. सीए बनून स्वतःची प्रक्टिस करायची आणि मोठमोठ्या कंपनीचे ऑडिटर म्हणून ऑडिट करण्याची त्याची इच्छा होती. अकाउंट विषयात त्याला आवड आणि चांगली गती होती. बी.कॉम मध्ये गोल्ड मेडल आणि सीए इंटर एका झटक्यात पास. पण काही कारणाने सीए फायनलचा एक ग्रुप न निघाल्याने तो सीए होऊ शकला नाही. पण त्या दरम्यान त्याने एम. कॉम आणि एम.बी.ए फायनान्स केले आणि असिस्टंट फायनान्स मॅनेजर म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. काही वर्षे तेथे अनुभव घेऊन त्याने नंतर कंपनी स्विच करून सध्याच्या कंपनीत 'फायनान्स मॅनेजर' म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळविली.

त्याच दरम्यान त्याचं संपदा नावाच्या मुलीशी लग्न झालं. संपदा शांत, विचार करून कृती करणारी, कामापुरतं बोलणारी, एम.बी.ए झालेली पण करियर पेक्षा सामाजिक कामात जास्त आवडत असणारी. त्यांना 'स्वरा' नावाची मुलगी. सहा वर्षाची, सद्या पहिलीत शिकते. स्वरा म्हणजे 'पापा कि परी'च. त्या तिघांचं छोटंसं हसतं खेळतं कुटुंब. पाच दिवस काम आणि शनिवार रविवार आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत घालवायचा असा विराटचा रुटीन होता.

पल्लवीने दारावर नॉक केलं आणि "मी आत येऊ का?"

म्हणून विचारलं. लगेच विराटची तंद्री तुटली व त्याने पल्लवीला यायला सांगितलं. पल्लवी नेहमी प्रमाणे छोटे मोठे डाऊट्स घेऊन आली होती. ती काही माहिन्याआधीच कंपनीत 'अकाउंट असिस्टंट' म्हणून जॉईन झाली होती.

"कुठलेही पैसे आले की आपण 'Debit whats come in' या नियमाप्रमाणे ते डेबिट करतो मग सिक्युरिटी डिपॉझिटचे पैसे आले की ते आपण क्रेडिट साईडला का टाकतो सर.?" पल्लवीने कुतूहलाने विचारले.

विराट हसला आणि उत्तरात, "बघ, जेव्हा सिक्युरिटी डिपॉझिटचे पैसे येतात तेव्हा आपण पण ते डेबिट करतो आणि 'सिक्युरिटी डिपॉझिट रिटर्न' अकाउंट क्रेडिट करतो कारण ती आपली लाईबिलिटी असते आणि कालांतराने ती SD परत करावी लागते म्हणून".

विराट तिच्या प्रश्नांचे उत्तर देत होता. सकाळी दिसलेल्या त्या मुलीचा चेहरा अचानक त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला. तिच्याबद्दल पल्लवीला विचारावे का असे विराटला वाटले देखील पण त्याने तिला विचारायचे टाळले. पल्लवी कॅबिन मधून बाहेर पडली आणि विराट पुन्हा त्या सकाळी दिसलेल्या मुलीच्या विचारतात मग्न झाला.

कॉफी घ्यावी आणि मूड फ्रेश करून कामाला लागावे म्हणून विराट कंपनीच्या कॅफेटेरियात गेला. कॉफीचा घोट घेत असतानाच कुणीतरी खांद्यावर हाथ ठेवला,
"विराट, कसा आहेस?"

"Ohh सर, मी मजेत आहे, तुम्ही?"

"मी पण, वेदिका ऑटोमोबाईलच्या टेंडरच काय झालं?" सावंत यांनी प्रश्न केला.

"सर, अजून फायनल झालेलं नाही आहे पण मला खात्री आहे ते आपल्यालाच मिळेल."

"बघ विराट, हे टेंडर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, या आधीच्या टेंडर मधून झालेला लॉस या मधून थोड्याफार प्रमाणात भरून निघेल, शिवाय शेयर होल्डर आणि प्रमोटर्सचा विश्वास संपादन करायला देखील याने मदत होईल." सावंत सर काळजीने बोलत होते.

"हो सर, मागील काही महिन्यांपासून घसरणाऱ्या शेयरसाठी हि सकारात्मक बातमी असेल, शेयरची घसरण थांबणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे" विराट उत्तरला.

"माझे आताच रेड्डी सरांशी बोलणे झाले, त्यांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे आणि वेदिका ऑटो शी तू चांगल्या प्रकारे डिल करशील याची त्यांना खात्री आहे." सावंतांनी उत्साहाने सांगितले.

"त्यांच्या अपेक्षेवर मी पूर्णपणे खरं उतरण्याचा प्रयत्न करेल, सर" विराट उत्तरला.

"हो मला खात्री आहे याची, तर चल मग दुपारच्या मिटींगला भेटू मग, बाय"

"ओके सर, बाय"

विराटही आपल्या कॅबिनकडे निघाला.
...

ठरल्याप्रमाणे 3 वाजता विराट मिटिंगसाठी कॉन्फरन्स हॉलमध्ये गेला. आज 'OSR टेक्नॉलॉजीची' बोर्ड ऑफ डायरेक्टरची रिव्हिव मिटिंग होती. विराट राउंड टेबलवर सावंत सरांच्या बाजूला बसला होता. सगळे डायरेक्टर आणि डिपार्टमेंटचे हेड मिटींगला उपस्थित होते. थोड्याच वेळात रेड्डी सरांचे आगमन झाले.

सुब्रमण्यम रेड्डी. OSR टेक्नॉंलॉजीचे सर्वेसर्वा. कंपनीचे CMD (Chairman & Managing Director) असणाऱ्या रेड्डीने अतिशय कष्टाने ह्या कंपनीची स्थापना केला आणि वाढविली. शिक्षणाने कम्प्युटर इंजिनियर असणाऱ्या रेड्डीना सॉफ्टवेयर क्षेत्राची भारी आवड. सुरुवातीला जॉब, मग मित्रांसोबत कंपनीची स्थापणा आणि नंतर त्यातून बाहेर पडून स्वतःची OSR टेक्नॉलॉजी हि कंपनी त्यांनी सुरु केली. सहा देशात तिचे ऑफिसेस. हेड ऑफिस पुण्यात. रेड्डीनी एकट्याने हा पसारा हाताळला आणि वाढविला देखील. कंपनी वाढायला लागल्यानंतर रेड्डींनी ती शेयर मार्केटमध्ये लिस्ट केली आणि मग कंपनीचे वटवृक्षात रूपांतर झाले. मग OSR टेक्नॉलॉजीने कधीच मागे वळून बघितले नाही. परंतु मागील काही वर्षांपासून कंपनीला नुकसान होत होते. कंपनीचे दोन तीन प्रोजेक्ट पूर्णतः फसले होते. शेयरचे भाव देखील दिवसेंदिवस घसरत होते. हि परिस्थिती हाताळली नाही तर कंपनी डबघाईला येईल याची रेड्डीना पूर्ण जाण होती. त्यासाठीच हि रिव्हिव मिटिंग ठेवली होती.

"येणार काळ हा नक्कीच कठीण असेल आणि त्या परिस्थितीला आपल्या सर्वांना सामोरे जायचे आहे" रेड्डी सरांच्या वजनदार आवाजाने कॉन्फरन्सला सुरुवात झाली.

"मागील काही वर्षापासून होणारा तोटा, घसरत जाणारा शेयरभाव, टॅक्स डिपार्टमेंटचा मागे लागलेला ससेमिरा, कंपनीत होणारी कर्मचारी गळती इ. गोष्टींमुळे आपण सर्वेच संभ्रमात आहोत, परंतु आपल्याला ही परिस्थिती नव्या जोमाने हाताळायची आहे आणि कंपनीला पूर्वपदावर आणून पूर्वीची प्रतिष्ठा परत मिळवून द्यायची आहे. त्यासाठी तीन मोठे बदल कंपनीत होणे अपेक्षित आहे."
आता सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागले की काय बदल होणार आहे, रेड्डी सर काय बोलतील ते.

रेड्डी पुढे म्हणाले, "वेदिका ऑटोमोबाईलचा प्रोजेक्ट आपल्याला मिळणे फार महत्वाचे आहे कारण त्यामुळे आपल्याला ह्या परिस्थितीतून सावरायला फार मदत होईल आणि ह्या साठी बोर्डाने तीन जणांची ह्या प्रोजेक्टसाठी निवड केली आहे".

आता हे तीन व्यक्ती कोण? त्यात आपलं नाव असेल का? ह्या प्रोजेक्ट साठी बोर्डाने आपल्यावर विश्वास टाकला असेल का? असे असंख्य प्रश्न तिथे उपस्थित असलेल्यांच्या मनात यायला लागले.

सर्वांची चालू असलेली कुजबुज थांबवत रेड्डी म्हणाले, "आता मी बोर्डाच्यावतीने पहिल्या व्यक्तीची ओळख आपल्याला करून देणार आहे, मिस पांडे, प्लिज,ओजस्वीला बोलवा."

रेड्डीची पी.ए ओजस्वीला बोलवायला गेली. थोड्याच वेळात दार उघडले आणि एक सुंदर तरुण मुलगी आता आली. तिला बघून विराट आश्चर्यचकित आणि थोडा अचंभीत झाला. कारण ती, तीच मुलगी होती जी त्याला आज सकाळी ऑफिसच्या गेट जवळ दिसली होती आणि आता तिला मिटिंग मध्ये बघून विराटला कळून चुकलं होतं की ती कुणीतरी महत्वाची व्यक्ती असणार. तेवढ्यात रेड्डी आपल्या खुर्चीवरून उठले, ओजस्वी त्यांच्याजवळ आली आणि तिच्याकडे हात करून रेड्डी म्हणाले," हि ओजस्वी, माझी एकुलती एक मुलगी."

सगळे एकमेकांकडे बघायला लागले. या आधी कुणीच रेड्डी सरांकडून त्यांच्या मुलीबद्दल काहीच ऐकले नव्हते.

"आतापर्यंत ओजस्वी अमेरिकेत होती, तिने तिथे हॉवर्ड मधून मास्टर ऑफ सायन्स पूर्ण केलं आणि एका मोठ्या आय. टी. कंपनीत अनुभव देखील घेतला आहे. आता ती आपल्याबरोबर इथेच काम करणार. आय होप, तिच्या अनुभवाचा आपल्या कंपनीला पुरेपूर फायदा होईल. बोर्ड मेंबर्सनी तिला आपल्या कंपनीच्या बॊर्डावर घायचं ठरविलं आहे आणि ती आता आपल्या कंपनीची 'वाईस प्रेसिडेंट' असणार आहे आणि या प्रोजेक्टच्या सर्व तांत्रिक बाबी ओजस्वीच बघेल."

टाळ्यांचा गडगडाट झाला. सर्वजण ओजस्वीच अभिनंदन करू लागले. विराट अजूनही तिच्याकडे पाहत होता. त्याची तिच्यावरून काही नजर हटत नव्हती. ओजस्वीने सर्वांचे आभार मानले. तिथेच खुर्चीवर बसताना तिची विराटशी नजरानजर झाली आणि तेव्हाच विराटच्या हृदयाची तार छेडली गेली.

"आता या प्रोजेक्टचे दुसरे महत्वाचे व्यक्ती आहे, ऍड. सुमंतो घोष." रेड्डीनी दुसरी महत्त्वाची घोषणा केली पण तिथे बसलेल्यापैकी ऍड. घोष कुणीच नव्हतं त्यामुळे सगळे एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागले.

"ऍड. घोष सद्या आपल्यात उपस्थित नाही आहे, पण ते लवकरच आपल्याला जॉईन होतील. ऍड. घोष हे निष्णात कायदे पंडित आहे आणि त्यांनी हायकोर्टात वकिली केली आहे. ते या प्रोजेक्टचे कायदेशीर सल्लागार असतील आणि कायदेविषयक बाबीत आपल्याला मदत करतील." रेड्डी उत्साहाने सांगत होते.

पुन्हा टाळ्यांचा गडगडाट झाला आणि पुन्हा एकदा ओजस्वी आणि विराटची नजरानजर झाली.

"आता या प्रोजेक्टच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या व्यक्तीची घोषणा करण्याची वेळ आली आहे." रेड्डी आपल्या भारदस्त आवाजात बोलत होते.

हा तिसरा व्यक्ती आपण तर नाही, या विचारत बऱ्याच जणांचे हृदयाचे ठोके वाढले होते, परंतु विराट मात्र ओजस्वीच्या विचारात मग्न झाला होता.

"आणि तो तिसरा व्यक्ती आहे, मिस्टर विराट देशमुख." रेड्डीनी विराटच्या नावाची घोषणा केली आणि आपले नाव एकूण खाडकन तो भानावर आला. काही कळायच्या आतच टाळ्यांचा वर्षाव सुरु झाला होता. विराटने सर्वांचे आभार मानले.

"या प्रोजेक्टसाठी विराटची फायनान्स एक्सपर्ट म्हणून निवड करण्यात आली आहे आणि हा प्रोजेक्ट तोच लीड करणार आहे. तो आता आपल्या कंपनीत AGM (असिस्टंट जनरल मॅनेजर) असेल. त्याच्या वित्त आणि लेख्यासंबंधी नॉलेजचा आपल्याला नक्कीच फायदा होईल."

खरतर विराटला हे अपेक्षित नव्हते. त्याच्यापेक्षा सिनियर असणाऱ्या 'सावंत' ची निवड होईल असे त्याला वाटत होते पण बोर्ड मॅनेजमेंटने तारुण्याने आणि उत्साहाने भरलेल्या विराटवर जास्त विश्वास टाकला होता. रेड्डीनी मिटिंग समाप्त केली. हॉल मधून बाहेर पडताना पुन्हा एकदा ओजस्वी आणि विराटची नजरानजर झाली. या वेळी त्यांची नजर जरा जास्तच एकमेकांत गुंतली होती.
...

"आज तू काही सायंकाळी स्वयंपाक करू नकोस, आपण बाहेर जाऊ जेवायला" विराट संपदाला म्हणाला.

"आज कसं काय? प्रमोशन झालं की काय तुझं?" संपदा मस्करीच्या स्वरात म्हणाली.

"हो, तसंच समज" विराट साध्या शब्दात उत्तरला.

"काय? खरंच! असं अचानक?" संपदाने आश्चर्याने विचारलं.

"हो एका प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली आहे आणि सोबतच AGM म्हणून प्रमोशन पण" बोलताना विराटच्या चेहऱ्यावर आनंद साफ झळकत होता.

"अरे वाह! हा तर डबल धमाका आहे, अब तो पार्टी भी डबल बनती है साहब" संपदा पण आनंदाच्या स्वरात उत्तरली.

"तू बोल तुला काय पाहिजे? आज तू जे म्हणशील ते" विराट उत्साहात म्हणाला.

"काही नाही रे, मला आणि स्वराला फक्त तुझं प्रेम आणि तुझा वेळ पाहिजे, बस" संपदा अगदी प्रेमाने विराटचा हात हातात घेत म्हणाली.

नंतर ते दोघे बराच वेळ रोमँटिक गप्पा मारत बसले. आज खूप दिवसांनी विराट पूर्वीसारखा रोमँटिक बोलत होता. लग्न झाल्यानंतचे ते दिवस फारच मस्त होते. घरी एकटीच असताना संपदा पुष्कळदा त्या आठवणीत रमून जात असे. आज बऱ्याच दिवसांनी ते दोघे एकमेकांसोबत इतक्या वेळ बोलत होते. आज विराटने स्वरासोबत पण भरपूर वेळ घालविला.

रात्री झोपतांना विराटसमोर आजची मिटिंग आणि ओजस्वी या दोनच गोष्टी येत होत्या. खरंतर प्रमोशन पेक्षाही जास्त आनंद त्याला त्या प्रोजेक्टमुळे झाला होता ज्यात ओजस्वी त्याच्या सोबत होती. तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून हटतच नव्हाता. कधी एकदाचं ऑफिसमध्ये जातो आणि तिला बघतो असं त्याचं झालं होतं.
...

आज विराट थोडया लवकरच ऑफिसमध्ये पोहोचला. ओजस्वी अजून यायची होती. विराटने माहिती काढली तर कळालं कि ओजस्वीची कॅबिन वरच्या फ्लोवरला होती. त्याला मनोमन वाटत होतं की तिची पण कॅबिन याच फ्लोअरला असायला पाहिजे होती पण नाईलाज. तो चुपचाप आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसला, लॅपटॉप उघडला आणि अकाउंट पेएबल (payable) आणि रिसिवेबल (receiveble) च्या आकडेवारीवर नजर फिरवू लागला पण त्यात त्याचे काही लक्ष लागत नव्हत. तेवढ्यात डेप्युटी मॅनेजर असलेला त्याचा मित्र सम्राट तिथे आला.

"अरे सम्या, ये. कसा आहेस?" विराटने उत्साहात प्रश्न केला.

"अरे हा प्रश्न तर मी तुला करायला पाहिजे विराट" सम्राट म्हणाला.

"का?" विराटने सहज प्रश्न केला.

"अरे तू आता मस्त AGM झालास, मस्त प्रोजेक्ट पण मिळाला तुला, मजा आहे भावा तुझी" सम्राट मस्करीत उत्तरला.

"कसली मजा, सर्व रेड्डी सरांची कृपा आहे रे" विराटने सहज उत्तर दिले.

"अरे तुला तर त्या वेदिका ऑटोच्या प्रोजेक्टमध्ये बिलकुल रस नव्हता," सम्राटने थेट गुगली फेकली आणि पुढे म्हणाला "मग काय ती सरांची मुलगी तर कारण नाही आहे ना ह्या प्रोजेक्टमध्ये रस घेण्याचं. "

"नाही बे सम्या, काहीही काय? त्या प्रोजेक्टमध्ये रस घेण्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे माझी AGM म्हणून निवड. रेड्डी सरांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे बस त्या विश्वासावर खरं उतरायचं आहे मला." विराट आत्मविश्वासाने सांगत होता.

"कुणाच्या विश्वासावर? रेड्डी सरांच्या कि त्यांच्या मुलीच्या?" सम्राट मस्करीत विराटला म्हणाला.

"बस कर बे सम्या, अजून मी AGM चा चार्ज पण नाही घेतला आणि तू माझी घेणं पण सुरु केलं." सम्राट उत्तरला आणि दोघही खळखळून हसले.

"अरे हा, तू AGM झालास मग इथे काय करत आहेस, तुझी नवीन कॅबिन तर वरच्या फ्लोअरला आहे," सम्राट उत्तरला.
"काय?" आश्चर्य आणि आनंदाचे मिश्रित भाव एकाच वेळी विराटच्या मुखातून बाहेर पडले.

"अरे हो, मला आताच ती HR वाली मिताली मॅडम सांगत होती." सम्राट उत्तरला.

"थांब, मी आताच कंफर्म करतो." म्हणत विराट ताडकन उठला आणि HR मध्ये गेला.

आपली नवीन कॅबिन वरच्या फ्लोवरलाच आहे हे कंफर्म झाल्यावर विराटचा आनंद गगनात मावत नव्हता. जग जिंकल्यासारखे वाटत होते त्याला आता.

क्रमशः

दुसरा भाग- येथे वाचा

No comments:

Post a Comment