10 December, 2018

काकीनाडा गर्ल


गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा लोकांकडे 'की पॅड' वाले छोटे नोकियाचे फोन असायचे, सोशल नेटवर्किंग तेव्हा 'ऑर्कुट' वरून चालायची. मी हि ऑर्कुटवर होतो, कविता लिहायचो, कथा लिहायचो, नवीन फ्रेंड्स बनवायचो. अश्यातच माझी तन्वी नावाच्या एका मुलीशी ओळख झाली. तिला माझ्या कविता आवडायच्या. ती नेहमी म्हणायची कि तुझ्या कविता वाचतांना वाटतं की त्या माझ्या स्वतःच्या भावना आहेत. मग आमची मैत्री वाढत गेली. दोघांकडेही sms पॅक होता, मग आम्ही दिवसरात्र चॅट करायचो. एकमेकांची सगळं शेयर करायचो.
तन्वी काकीनाड्याला राहायची. काकीनाडा हे आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवरच एक लहान शहर. ती मराठी कुटुंबातलीच पण तिचे वडील 'काकीनाडा सी पोर्ट' येथे कामाला असल्यामुळे ती फॅमिली सोबत तेथे राहायची. तेथेच ती इंजिनियरिंग करत होती. रोजच्या बोलण्याने आमची मैत्री वाढतच गेली. मला ती आवडायला लागली होती. मी तिला भेटायला काकीनाड्याला जायचं ठरवलं. ती पण आतुर होती भेटायला.
काकीनाड्याला जायचा दिवस उगवला. मी पुण्यावरून काकीनाडा एक्सप्रेस पकडली. आपल्या बर्थवर जाऊन बसलो. रात्री 10.30 वाजता गाडी काकीनाड्याच्या दिशेने निघाली. तेव्हा नेटवर्क प्रॉब्लेम खूप असायचा त्यामुळे गाडीत तिच्याशी चॅट करणे काही शक्य नव्हते आणि तेव्हा कॉल रेट पण बरेच असायचे त्यामुळे कॉल पण फक्त कामापूरतेच केले जायचे. स्मार्टफोन पण नव्हता तेव्हा त्यामुले काहीच ऑप्शन नसल्याने मी सरळ झोपी गेलो. सकाळी 6 च्या सुमारास गाडी कुठल्यातरी स्टेशनवर थांबली तेव्हा झोप उघडली. गुलबर्गा स्टेशन होते ते. समोरच्या बर्थवर देखील कुणीतरी झोपलं होत, रात्री आलं असणार कदाचित. त्या व्यक्तीने आपली कूस बदलली. डोक्यावरून घेतलेलं पांघरून थोडं खाली सरकलं आणि तिच्या सुंदर निरागस चेहऱ्याचं दर्शन मला झालं. त्या शांत चेहऱ्यावर झोपेतही एक प्रसन्नता दिसत होती. त्या चेहऱ्याकडे एक टक नजर रोखून बघतच राहावं असा चेहरा होता तो, तरी पण मी नजर हटविली बॅगेतून पुस्तक काढले आणि वाचायला लागलो. गाडी सुटतांना एक लहानसा झटका लागतो तसा झटका लागला आणि तिची झोप उघडली.  "कोणतं स्टेशन आहे?" तिने खिडकीतून बाहेर बघत विचारलं. "गुलबर्गा" पुस्तकातून वर बघत मी उत्तर दिलं. "6 वाजले आहे आणि आता गाडी गुलबर्ग्यात? म्हणजे तास दिड तास लेट आहे वाटते गाडी आज." "तुम्ही नेहमी जाता का या गाडी ने?" "हो" आणि मग आमचं बोलणं सुरु झालं. आपल्या लहान बहिणीसोबत ती सोलापूरला मावशीकडे आली होती. आता वापस काकीनाड्याला जात होती. म्हणजे ती काकीनाड्यापर्यंत माझ्या सोबत असणार होती. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. ती पण मोकळेपणाने बोलत होती. कर्नाटक आंध्रतल्या निसर्गरम्य परिसरातून गाडी जात असतांना तिच्याशी बोलणे आता जास्तच रोमॅंटिक वाटू लागले होते. आज तन्वीचा पण मॅसेज आला नव्हता, मी पण तिल मेसेज केला नव्हता. खरंतर मला तिची आठवनच आली नव्हती.  गप्पांच्या ओघात राजमुन्द्री जंक्शन येऊन गेले, आता फक्त तास दीड तास होता काकीनाडा यायला. पण मला अजून तिचे नाव माहित झाले नव्हते. मी तिला नाव विचारले तर ती म्हणाली, "नावात काय ठेवलं आहे...? आणी तसंही आपली पुन्हा भेट होणे शक्य नाही." "का? असं का बरं?" मी सहज प्रश्न केला. "प्रवासात भेटी झालेल्यांपैकी मला आजपर्यंत कधीच कुणी परत भेटलेलं नाही." "तर काय झालं, या वेळेस भेटू शकते ना, आणी स्वतः बद्दल एवढी माहिती सांगितली तर आता नाव सांगायला काय हरकत आहे?" "प्रत्येक नावाला एक चेहरा असतो पण प्रत्येक चेहऱ्याला एक नाव असलेच पाहिजे का..?" डायरेक्त गुगली टाकली तिने. अश्या बऱ्याच गुगल्या तिने आता पर्यंत टाकल्या होत्या सो हि गुगली काही नवीन नव्हाती. "...पण प्रत्येक चेहऱ्याची एक ओळख असते ती नावाशिवाय कशी बरं पूर्ण होणार.?" मी सहज उत्तर दिले. "बरं, मग माझी ओळख....हममममम...काकीनाडा गर्ल." "काय.? काकीनाडा गर्ल?" मी आश्चर्याने विचारले. "हो, म्हणजे बघ, मी जर नाव सांगितले तर तुला कालांतराने फक्त माझे नाव आणि चेहरा लक्षात राहील पण जर तू माझी ओळख 'काकीनाडा गर्ल' म्हणून ठेवशील तर तुला हा पूर्ण प्रवास लक्षात राहील. आणि तुझा काकीनाडा येण्याचा पहिला अनुभव अविस्मरणीय राहायला पाहिजे असं मला वाटते." "राहिलंच, हि भेट, हा प्रवास कायम माझ्या स्मरणात राहील, पण माझे नाव...." "तुझे नाव 'पुणेरी मुलगा'..." माझे बोलणे अर्ध्यात थांबवत तीने उत्तर दिले. "पुणेरी मुलगा..!छान आहे की...म्हणजे जेव्हा केव्हा पुण्याचा उल्लेख होईल तेव्हा तुला मी आठवेल हा..." "हो म्हणजे काय..? आणि आपला हा प्रवास सुद्धा...." आता गाडी काकीनाडा स्टेशनवर पोहोचली होती. तासभर लेट झाल्यामुळे 10 वाजले होते. हे शेवटचे स्टेशन असल्यामुळे पूर्ण गाडीचं रिकामी होणार होती. खाली उतरण्यासाठी प्रवास्यांची रांग लागली होती. आता शेवटचं म्हणून तिचा मोबाईल नंबर घायचा राहिला होता. पण नंबर मागू कि नको आणि मागितला तर ती देणार कि नाही ह्या द्विधा मनस्थितीत मी होतो. आतापर्यंतचा पूर्ण प्रवास माझ्या नजरेसमोर तरळून गेला. तिचं बोलणं, तिचं हसणं, त्या गप्पा हृदयाच्या तार छेडू लागल्या होत्या. कुणीतरी खूप महत्त्वाचं दूर जात आहे अश्या प्रकारची भावना माझ्या मनामध्ये घर करू लागली होती. ह्याच विचारात मी प्लॅटफॉर्मवर उतरलो. तिला गर्दीत शोधू लागलो. ती कुठेच दिसत नव्हती. थोड्या दूर तिची बहीण दिसली, तीच्या बाजूलाच ती होती. एक वयस्कर माणूस पण होता सोबत, कदाचित तिचे वडील असेल त्यांना घ्यायला आलेले. तिने मागे बघितलं, मी तिच्याचकडे बघत होतो. आमची नजरानजर झाली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. तिने एक हलकेसे स्मित केले, मान वळविली, बॅग उचलली आणि जायला लागली. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निशब्द होऊन बघत होतो. ती गर्दीत दिसेनाशी होऊन गेली. कुणाचातरी मला धक्का लागला आणि मी भानावर आलो. मित्राच्या भावाला म्हणजेच सुधीरला फोन केला जो मला घ्यायला येणार होता. आम्ही त्याच्या रूम वर गेलो. तेथेच मुक्काम होता माझा. दुसऱ्या दिवशी मला तन्वीला भेटायला जायचे होते. तिला मी काकीनाड्यात पोहोचल्याचं कळवलं. थकलेलो असल्यामुळे आता न बोलता किंवा चॅट न करता उद्या भेटून बोलू म्हणून तिच्याशी बोलणे टाळले आणि झोपी गेलो. पण आताही त्या 'काकीनाडा गर्ल'चेच विचार मनामध्ये घोळत होते. तिला ट्रेन मध्ये पहिल्यांदा बघितल्यापासून ते प्लॅटफॉर्मवर शेवटचं बघण्यापर्यंतच संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उघ राहत होत. खरंतर आजपर्यंत कुठल्याच मुलीशी बोलून असं नव्हतं झालं, काय माहित हे प्रेम होत की फक्त आकर्षण. ह्याच विचारात सकाळी पहाटे केव्हातरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी केली आणि तन्वीला फोन केला. तिने समुद्रकिनाऱ्याजवळील एका निसर्गरम्य ठिकाणी भेटायला बोलाविले. सुधीरने मला तेथे सोडून दिले. मी तन्वीची वाट पाहू लागलो. त्या भागात जास्त वर्दळ नव्हती. दुरून एक मुलगी येतांना दिसली. खरंतर आम्ही कधीच एकमेकांना बघितलेले नव्हते, तिचा फोटो पण नव्हता ऑर्कुटवर. माझा पण नव्हता. ती जवळ आली आणि तिला बघून मी शॉक झालो. ती 'काकीनाडा गर्ल' होती. मला इथे बघून ती पण आश्चर्यचकित झाली. तिला बघताच मला तिचं वाक्य आठवलं, "प्रवासात भेटी झालेल्यांपैकी मला आजपर्यंत कधीच कुणी परत भेटलेलं नाही." "तू इथे?" मी विचारले. "हो, मी एकाला भेटायला आले आहे इथे. आणी तू?" "अंग मी तन्वी नावाच्या एका मुलीला भेटायला आलोय इथे..? "काय..? त्या ऑर्कुटवाल्या तन्वीला?" तिने शॉक होऊन विचारले. "हो, पण हे तुला कसं कळालं.?" आता माझे स्पंदन वाढले होते. "अरे मीच ती ऑर्कुटवाली तन्वी, तू प्रथमेश का..?" माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. "हो, मी प्रथमेश, तो कविता, चारोळ्या लिहिणारा" "अरे देवा..! म्हणजे ज्याला मी काकीनाड्यात भेटणार होती त्याला मी एक दिवस आधी ट्रेन मधेच भेटले तर."  "हो आणि नकळत का होईना आपण एकमेकाना पुष्कळसं समजून देखील घेतलं त्या प्रवासात" आता माझा आनंद गगनात मावत नव्हता. ज्या मुलीला मी प्रवासात मनमोकळेपणे जाणून घेतले होते, जी मुलगी मला नकळत आवडायला लागली होती आणि ज्या मुलीला मी भेटायला आलो होतो ती एकच होती. निसर्गाने खूप मोठा डाव रचून हा योगायोग घडवून आणला होता. 'तन्वी' आणि 'काकीनाडा गर्ल' एकच होती पण फक्त 'तन्वी'ला काकीनाड्यात भेटून मी जेवढं समजून घेतलं असतं त्यापेक्ष कितीतरी जास्त मी तिला 'काकीनाडा गर्ल' म्हणून ट्रेन मध्ये समजून घेतलं होतं. एक मुलगी दोन व्यक्तिमत्वात माझ्या समोर आली होती आणि दोन्ही रुपात ती मला आवडली होती. म्हणून तिच्याशी ट्रेन मध्ये बोलताना काही गोष्टी तन्वीशी मिळत्या जुळत्या आहे असे राहून राहून वाटत होते. पुढील दोन दिवस मी काकीनाड्यात होतो. तिच्यासोबत संपूर्ण काकीनाडा फिरून घेतले. मी एका मुलीला भेटायला आलो होतो, जाताना दोघीला घेऊन चाललो होतो. 'काकीनाडा गर्ल' काकीनाडा स्टेशनवर पुण्याला जात असलेल्या 'पुणेरी मुलाला' सोडायला आली होती. "मी जर नाव सांगितले तर तुला कालांतराने फक्त माझे नाव आणि चेहरा लक्षात राहील पण जर तू माझी ओळख 'काकीनाडा गर्ल' म्हणून ठेवशील तर तुला हा संपूर्ण प्रवास लक्षात राहील."  ट्रेन काकीनाडा स्टेशनवरून निघतांना तिचं हे वाक्य मला सारखं आठवत होत, कारण हा प्रवास आता कायम माझ्या लक्षात राहणार होता. -अनिकेत भांदककर
www.instagram.com/shabdjhep www.facebook.com/shabdjhep

No comments:

Post a Comment