14 June, 2017

पहिला पाऊस



पहिला पाऊस खूप काही देऊन जातो. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या जीवांना सुखावून जातो. उन्हाने करपलेल्या, भेगा पडलेल्या ओसाड धरतीला भिजवून जातो. पहिल्या पावसात मातीचा येणारा सुगंध तर काही अप्रतिमच असतो. कडक उन्हाने जीवाची जी काही लाही लाही झाली असते ती पहिल्या पावसाने अगदी घामासकट धुवून निघते. ते टपोरे पाण्याचे थेंब भलेही टोचणारे असतील पण ते आता हवे हवेसे वाटतात. ओले झालेले कपडेसुधा आनंदाने बदलावेसे वाटतात. डोक पुसत मग वाफाळलेला चहा घेत खिडकीत बसुन नुसतंच त्याला पाहत बसावसं वाटतं. आणी मग मनात विचारांच जे काहुर माजतं ते असं......

आभाळ गडगडलं, विजा चमकल्या 
ढगांनी वेढलं तळपत्या सूर्याला.
थेंबामागून थेंब जमिनीवर पडला 
काळ्या मातीतुन सुगंध दरवळला.

आल्या सरी रीप-झिप करीत 
भणंग धरतीला ओल्या करीत.
आधी टपोरे थेंब, मग टपोऱ्या गारा 
न्हाऊन निघाला हा परिसर सारा.

सुखावली मनं, शांत झाली धरती 
उपकार त्याचे जो वरूण आहे वरती.
थोडा अजुन बरस, मज शांत भिजू दे 
घामाच्या धारासाहित निराशा पुसू दे.

चिंब हि धरती अन गार हा वारा 
तुझ्या कवेत आज, हा विश्व सारा.
उधळू दे रंग मज तू माझ्या मनाचे
विश्वाच्या रंगात इंद्रधनुष्य प्रेमाचे.

टाक इवलासा कटाक्ष या धरतीकडे 
बघ किती आनंदले इवलेसे गाव माझे. 
सुखावले गावकरी तुझ्या आगमनाने 
पुजतील तुला जन्मभर अभिमानाने.

असाच बरसात रहा चोहीकडे 
पुन्हा दुष्काळ आम्हा देऊ नकोस. 
गावकऱ्याच्या च्या भावनांशी
असा लपून- छपून खेळू नकोस. 

आजचा दिवस तुझ्या संगतीत गेला.
तुझ्या वाचुन फक्तच उन्हाळा नी हिवाळा.
असेच उपकार कर या धर्तीवर 
आमचाही असंच तुझ्यावर जिव्हाळा.

- अनिकेत भांदककर 

No comments:

Post a Comment