04 June, 2017

वाटण्यातला आनंद (हृदयस्पर्शी कथा)

कालच मित्राला त्याच्या जीवनातील पहिला पगार मिळाला, म्हणाला, "कपडे घायला जाऊया". खूप दिवसापासून दोन जोडी कपड्यावर काम भागवित होता तो. ब्रँडेड कपडे घ्यायचे होते त्याला. कपड्याच्या शोरूम मध्ये ब्रँडेड कपडे बघतांनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. थोड्या वेळाने म्हणाला, "चल दुसरीकडे बघुया".

काय झाले काहीच कळले नाही. मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. साध्या दुकानात. आता तो लोकल कपडे बघू लागला. विचारले काय झाले तर काहीच बोलला नाही. तिथून कपडे घेऊन आम्ही बाहेर पडलो. म्हणाला, "जवळपास दोन हजार वाचलेत".

मला आश्चर्यच वाटलं, कालच पगार झाला, पगारही चांगला, पहिल्या पगारात ब्रँडेड कपडे घेईल म्हणून हा इतके दिवस जीव लावून बसला होता, आणि आता काय झालं अचानक असं.?

तो मला सरळ एका हलवायाच्या दुकानात घेऊन गेला, तिथे त्याने काही प्लेट समोसे आणि भरपूर जिलेब्या घेतल्या. मग तिथून आम्ही एका कन्स्ट्रक्शन साईटवर गेलो. मला काहीच कळत नव्हतं, तोही काही बोलत नव्हता. थोड्याच वेळात जेवणाची सुट्टी झाली. जेवणासाठी झाडाखाली सावलीत बसलेल्या मजुरांना तो समोसे आणि जिलेबी वाटू लागला, कुणी विचारलं तर सांगायचा, आज माझा वाढदिवस आहे म्हणून. दोन महिन्यापुर्वीच त्याचा वाढदिवस झाला होता. मला काहीच कळत नव्हतं. समोसे- जिलेबी वाटतांनाचा आनंद मात्र त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. सर्व झाल्यावर त्याला मी विचारले कि तुझा वाढदिवस तर मागेच झाला ना, तर तो म्हणाला,"हो, ते फक्त निमित्य होतं, खरंतर मगाशी ब्रँडेड कपडे न घेता वाचलेल्या पैशात मी जर काही लोकांना थोडा आनंद देऊ शकत असेल तर याहून मोठा आनंद दुसरा कोणता असेल...?"

"ब्रँडेड कपडे घालून चार दिवस मिरविण्यापेक्षा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला जास्त ब्रँडेड फिल करवतो. आणी आता मी ठरवलंय कि प्रत्येक महिन्याला पगार झाला कि अश्या प्रकारे मी माझा वाढदिवस खोटा का असेना साजरा करीत जाईल..."

खरच, मगाशी ब्रँडेड कपडे घेताना त्याच्या चेहऱ्यावरील झळकणाऱ्या आनंदापेक्षा आताचा आनंद, समाधान आणी अभिमान कितीतरी अधिक होता.

"बेटा गेल्या कित्येक दिवसात समोसे- जिलेबी नव्हती खाल्ली रे, आज मन तृप्त झालं माझं, बेटा, खूप मोठा हो, आनंदी राहा, असाच लोकांची सेवा करीत रहा", एक वयस्कर मजूर आशीर्वाद देऊन गेला.
आता मात्र त्याचे डोळे पाणावले होते. फक्त स्वतःचाच नाही तर इतरांचाही विचार करण्याचं हे फळ होत. 


- अनिकेत भांदककर

2 comments: