26 May, 2015

अतुलनीय आणी अविश्वसनीय


अतुलनीय आणी अविश्वसनीय अश्या स्वरुपाचा विजय म्हणून मुंबई इंडियन्सचे वर्णन करावे लागेल. कारण अश्यासाठी कि सुरुवातीला लगातार चार सामने गमाविल्यानंतर आश्चर्यकारकरित्या मुंबईने वापसी केली आणी सेमी फायनल आणी फायनलमध्ये चेन्नई सारख्या बलाढ्य आणी पूर्ण सिजन अव्वल राहिलेल्या टीमला मुंबईने  ज्या पद्धतीने धूळ चारली त्यासाठी. अर्थातच यात टीम मुंबईच्या सांघिक खेळाचा फार मोठा वाटा आहे. पूर्ण सिजनमध्ये कुणी एक हिरो न ठरता प्रत्येक सामन्यात एखादजण  हिरो ठरत होता हे जास्त महत्वाच आहे. ऑरेंज, पर्पल किवा सर्वात जास्त सिक्सेस मध्ये मुंबईचा एकही खेळाडू अव्वल नव्हता. पण एकंदर छक्के मारण्यात मुंबई अव्वल, या सिजनचे सर्वात जास्त सामने देखील मुंबईनेच जिंकले आहे. ज्या सामन्यात सुरुवातीचे महारथी अपयशी ठरले त्या सामन्याला पांड्या, भज्जी, रायडूने सांभाळले. म्हणजेच येथे सांघिक खेळाचं पुरेपूर प्रदर्शन मुंबईने केलं आहे. सिमन्स, पांड्या आणी म्याक्लेन्घन हे तर मुंबईला गवसलेले हिरेच आहे.

या सिजनची अजुन एक अधोरेखित करण्याजोगी गोष्ट म्हणजे रोहित शर्माची कप्तानी. IPL मध्ये धोनी नंतरचा सर्वाधिक यशस्वी कप्तान तोच ठरला आहे. त्याच्या काप्तानीचे विराट कोहली समोर नक्कीच आव्हान असेल. फलंदाजीच्या बाबतीत तर रोहित सर्वश्रेष्ठ आहेच. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 रन दोनदा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. शिवाय त्याच्याकडे असणारे खेळाचे तंत्र आणी त्याने लगावलेले फटके तर अप्रतिम आहे.

जेव्हा मुंबई सलग चार सामने हरली तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली. सचिन, पोंटिंग, जॉन्टी र्होड्स, कुंबळे, रोबिन सिंग ई. धुरंदर सहाय्यकारी टीम मध्ये असताना मुंबई इतकी हारुच कशी शकते? अशी प्रतिक्रिया उठत होती. त्यानंतर तर whatsapp वर एक संदेश फिरत होता, तो असा “एखाद्या कंपनीत कामगारांपेक्षा व्यवस्थापकांची संख्या जास्त झाली कि काय होते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन्स”. पण पोंटिंगचं मार्गदर्शन, सचिनचे सकारत्मक सल्ले, जॉन्टी र्होड्स च्या टिप्स ई. नक्कीच मुंबईच्या उपयोगी पडलं असेल आणी त्यानंतर त्यांनी जो आपला खेळ उंचावला तो सरळ चषक जिंकत पर्यंत कायम राहिला. संघातील युवा खेळाडू हार्दिक पांड्या, उन्मुक्त चांद, सुचित, बुमरह ई त्याच बरोबर वरिष्ठ खेळाडू आणी अति वरिष्ठ सचिन, पोंटिंग ई. चा देखील उत्साह ओसंडून वाहत होता.


हिम्मत, मेहनत आणी जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मनुष्य/ टीम काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन.

No comments:

Post a Comment